
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोने मागील महिन्यात प्लॅटफॉर्मची फी वाढवल्याने या प्लॅटफॉर्मवरून जेवण ऑर्डर करणे महाग झाले होते. आता पुन्हा एकदा या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून जेवण ऑर्डर करणे महाग होणार आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच 22 सप्टेंबरपासून स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केल्यास डिलिव्हरी चार्जवर 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे ऑर्डर करणे महाग होणार आहे. याचाच अर्थ आता प्रत्येक ऑर्डरवर अतिरिक्त टॅक्स ग्राहकांना भरावा लागणार आहे.
झोमॅटो आणि स्विगीने याआधी प्लॅटफॉर्मची फी वाढवली आहे. स्विगीने काही शहरांत हे शुल्क 15 रुपयांपर्यंत केले आहे. ज्यात जीएसटीचाही समावेश आहे, तर झोमॅटोने 12.50 रुपये आणि मॅजिकपीनने 10 रुपये प्रति ऑर्डर शुल्क ठेवले आहे. डिलिव्हरी चार्जवर जीएसटी लागू झाल्यानंतर आता झोमॅटोवरून ऑर्डर करताना आता जवळपास दोन रुपये आणि स्विगीवरून ऑर्डर करताना 2.6 रुपये प्रति ऑर्डर अतिरिक्त द्यावे लागतील. केंद्रीय अर्थमंत्रालयाने डिलिव्हरी चार्जवर नवीन टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या नव्या नियमानुसार, जर डिलिव्हरी कोणत्याही नोंदणीकृत व्यक्तीकडून थेट दिली जात असेल तर त्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल, तर डिलिव्हरी कोणत्याही ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी द्यावी लागत असेल आणि ती नोंदणीकृत नाही, तर जीएसटी ई-कॉमर्स ऑपरेटर (ईसीओ) कडून दिली जाईल. या बदलाचा थेट परिणाम ग्राहकांच्या डिलिव्हरी खर्चात आणि प्लॅटफॉर्म शुल्कावर पडणार आहे. या बदलाचा शेअर मार्केटवरही परिणाम दिसला आहे. मंगळवारी स्विगीच्या शेअरमध्ये तीन टक्के वाढ पाहायला मिळाली. बीएसईमध्ये स्विगीचा शेअर 245.30 रुपयांवर उघडला आणि 428.30 रुपयांपर्यंत पोहोचला, तर झोमॅटोचे शेअरसुद्धा 323.45 रुपयांवर उघडला आणि 326.30 रुपयांपर्यंत पोहोचला.