हळद, लग्नातील वायफळ खर्च, दारूबंदीसाठी रस्त्यावर; उरणमध्ये स्त्रीशक्तीचा एल्गार

हळद, लग्न समारंभातील वायफळ खर्चाला आळा घालावा आणि दारूबंदी करावी या मागणीसाठी आज उरणच्या वशेणी गावात महिला रस्त्यावर उतरल्या. गावातील दारूची दुकाने बंद केली नाहीत तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा एल्गार दिसून आला.

लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर वायफळ खर्च करण्यात येतो. कर्जबाजारी होऊन ही उधळपट्टी होत असते. हळदी समारंभातदेखील दारू, मटणावर अनाठायी खर्च होतो. सध्याच्या आधुनिक काळात चुकीची प्रथा बंद करून नवा आदर्श निर्माण करावा यासाठी वशेणी गावच्या सरपंच अनामिक म्हात्रे, प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी जनजागृती रॅली काढली. वशेणी गाव परिसरात गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून देशी दारूची दुकानेदेखील आहेत. ही सर्व दुकाने तत्काळ बंद करण्याची मागणी महिलांनी केली.

यश मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार

वशेणी गावातील दारूची दुकाने बंद करण्याचा ठरावदेखील ग्रामपंचायतीने दिला असल्याची माहिती सरपंच अनामिक म्हात्रे यांनी दिली. जनजागृती करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. दारूबंदीच्या लढ्याला यश येईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही महिलांनी केला आहे.