
बीडमध्ये न्यायाची मागणी करत दोन तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. धाराशीवमध्ये शक्तिपीठ मार्गाला विरोध करणाऱया शेतकऱयांनी पालकमंत्र्यांना घेराव घालून ‘अगोदर आम्हाला गोळय़ा घाला, नंतर शेताची मोजणी करा!’ असे खडे बोल सुनावले. धाराशीवमध्येच खासगाव येथील एका ग्रामस्थाने सुविधांसाठी सरकारच्या नावाने ठणाणा केला.
न्याय द्या, न्याय द्या… असा टाहो फोडत केज तालुक्यातील कुंबेफळ येथील विशाल अशोक थोरात आणि शेखर उद्धव थोरात या दोन तरुणांनी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काफिल्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक काफिल्यात दोन तरुण घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हे दोन्ही तरुण गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे आज त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा काफिला अडवून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
अगोदर आम्हाला गोळ्य़ा घाला! शक्तिपीठ मार्गाला विरोध करणाऱया शेतकऱयांनी पालकमंत्र्यांना सुनावले
धाराशीवमध्ये शक्तिपीठ मार्गाला विरोध करणाऱया शेतकऱयांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला. या मार्गासाठी शेतीची मोजणी करण्यास या शेतकऱयांचा विरोध आहे. देवळाली येथील अभिजीत देशमुख, महेश काटे, सुनील भोसले, बालाजी देशमुख, आबासाहेब देशमुख यांच्यासह इतरांनी पालकमंत्र्यांना मोजणीवरून जाब विचारला. त्यावर पालकमंत्र्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱयांनी ‘अगोदर आम्हाला गोळय़ा घाला आणि नंतर शक्तिपीठासाठी शेताची मोजणी करा!’ असे खडे बोल सुनावले. ध्वजारोहणाच्या वेळीच परंडा तालुक्यातील खासापुरी येथील शंकर तात्या चव्हाण यांनी गावातील मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवला.