‘एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मतचोरीचा’; मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे अनोखे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी ‘एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मतचोरीचा, एक पेढा खड्डय़ांचा, एक पेढा महागाईचा,’ अशा घोषणा देत पेढे आणि गाजर वाटप केले.

 शिवसेनेने आयोजित केलेल्या या आंदोलनाला मोठय़ा संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांची उपस्थिती होती. आंदोलनाची सुरुवात कसबा गणपतीची आरती करून करण्यात आली. यावेळी ‘मोदींना सुबुद्धी मिळावी आणि देशाचे भले व्हावे’ अशी प्रार्थना करण्यात आली. ‘एक पेढा भ्रष्टाचाराचा’, ‘एक पेढा महागाईचा’ ‘जनता हैराण, मोदी पायउतार व्हा’ अशा घोषणा देत नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

 शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, ‘भाजप ही जुमला पार्टी बनली असून, मतदारांची फसवणूक झाली आहे. देशात महागाईने उच्चांक गाठलेला आहे, पुणेकर खड्डय़ांनी हैराण आहेत, मतचोरी सुरू आहे आणि भ्रष्टाचारी आमदार सत्तेचा मलिदा खात आहेत. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ही घोषणा फसवी ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱया मोदींनी सत्तेवरून पायउतार व्हावे, हीच आमची मागणी आहे.’