
‘आम्ही या भागाचे भाई आहोत,’ असे म्हणत कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीने बुधवारी रात्री कोथरूडमध्ये खुलेआम दहशत माजवली. किरकोळ वादाच्या कारणावरून या टोळीतील सराईतांनी प्रथम गोळीबार केला आणि काही वेळातच दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल दहशत माजविणाऱ्या पाचजणांना कोथरूड पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.
करण्यात आले आहेत.
मयूर गुलाब कुंबरे, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चादळेकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. बुधवारी (दि.१७) मध्यरात्री सुमारे बारा वाजता कोथरूड भागातील मुठेश्वर मंडळ परिसरातून प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गाडीने जात होते. त्यावेळी गाडीला रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून तेथून जाणारे घायवळ टोळीचे सदस्य भडकले. यात झालेल्या वादावादीनंतर आरोपी कुंबरे याने क्षणार्धात पिस्तूल काढून थेट धुमाळ यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्यांच्या मांडीला लागली असून, ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत धुमाळ यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या गल्लीत धाव घेतली. त्यावेळी स्थानिक नागरिकाने त्यांना मदत करून तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल केले.
एवढ्यावरच हे टोळके थांबले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर केवळ १५ ते २० मिनिटांतच टोळीने पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी हल्ला केला. हे टोळके येथील सागर कॉलनी परिसरात पोहोचले आणि तेथे उभ्या असलेल्या साठे या युवकावर त्यांनी कोणतेही कारण नसताना कोयत्याने वार केले. ‘आम्ही या भागाचे भाई आहोत’, असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत माजिवली. त्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासात हे आरोपी कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंधित असून, त्यांचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे समजले. सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर, अंमलदार दत्ता सोनवणे, श्रीकांत दगडे, मंगेश शेळके, विष्णू राठोड, शकील पठाण, आकाश वाल्मीकी, वैभव शितकाल, मयूर पांढरे, जय खरात यांच्यासह पथकाने शोधमोहीम राबवून घटनेनंतर पसार झालेल्या पाच जणांना ताब्यात घेतले.
गोळीबार प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतले आहे. काही आरोपी हे रेकॉ र्डवरील गुन्हेगार असून घायवळ टोळीशी संबंधित आहेत. यात आणखी कुणी सहभागी आहे का, यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन.