औंध, पाषाण, पिंपरीला पावसाने झोडपले; पुढील दोन दिवस पावसाचे

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने आजदेखील पुण्यातील पाषाण, औंध, कोथरूडसह पिंपरी-चिंचवडला झोडपले. आज दुपारी तीननंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्तांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही क्षणातच पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

पिंपरी-चिंचवडमध्येदेखील सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. काही भागात विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. पुणे शहरासह जिल्ह्यात रविवार पासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. सतत पडणाऱ्या पवसाने शहरासह ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले ओहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाषाण भागात ७१.८, शिवाजीनगर भागात ३६.२, चिंचवड भागात १८, माळीण १७.५, हवेली १७, हडपसर १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. मात्र, दुपारी तीननंतर अचानक पावसाचा जोर वाढला. जोरदार पाऊस बरसू लागल्याने नागरिकांची धांदल उडाली. अवघ्या काही क्षणातच शहरातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.

पुणे शहरासह जिल्ह्यात १९ आणि २० सप्टेंबर रोजी हवामान ढगाळ राहणार असून, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.