
आयुष्यात कोणतीही गोष्ट करायला वयाचं बंधन नसतं. जर जिद्द आणि चिकाटी असेल तर अवघड गोष्टही आपण सहज साध्य करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळच्या लीला जोस. त्यांनी वयाची भीड न बाळगता 71 व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील कोन्नाथडी येथील रहिवाशी लीला जोस 13 हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करणाऱ्या राज्यातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत.
लीला यांनी स्कायडायव्हिंगचे स्वप्न पाहिले होते. आकाशात उडणारी विमाने पाहून त्यांना अनेकदा आकाशात झेपावण्याची इच्छा होत होती. एकदा उडणारे विमान पाहून त्यांनी मित्रांना सहज म्हटले होते, स्कायडायव्हिंग करायला किती मजा येईल! त्यावेळी सगळ्यांनी त्यांची थट्टा केली. मात्र, लीला यांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. हा थरारक अनुभव घेण्याची त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या मुलाला भेटण्यासाठी लीला गेल्या महिन्यात दुबईला गेल्या होत्या. त्यांनी मुलाकडे स्कायडायव्हिंग करण्याची इच्छा व्यक्त केली.
आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलाने (अनीश) दुबईच्या स्कायडायव्हिंग टीमसोबत टँडम जंप बुक केला आणि अनिश आपल्या 71 वर्षाच्या आईला घेऊन तेथे पोहोचला. स्कायडायव्हिंग करण्यासाठी आलेल्या लीला यांना पाहून तेथील प्रशिक्षक आश्चर्यचकीत झाले. अनिशने उड्डाण, मार्गदर्शक आणि व्हिडिओग्राफी यासाठी जवळजवळ 2लाख रुपये खर्च केले. लीला यांनी अनुभवलेला तो क्षण सुवर्णक्षणांपैकी एक होता. “एका क्षणी, मला फार हलके वाटले, त्या वेळी मी सगळे विचार विसरून त्या क्षणाचा आनंद घेतला, असे लीला यांनी सांगितले.
इडुक्कीमध्ये घरी परतल्यावर, लीलाने तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या साहसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. लीला यांनी 71 व्या वर्षी तिचे स्वप्न पूर्ण केले. आता अंतराळात झेपणावण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जर वयाची मर्यादा नसेल तर मी इस्रोला माझ्या इच्छेचा विचार करण्यास सांगू इच्छिते, असेही लीला यांनी सांगितले.