
खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीसंबंधी प्रकरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेले विधान सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ‘मी कधीही, किमान 24 नोव्हेंबरला निवृत्त होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करणार नाही’, असे सर न्यायाधीशांनी खुल्या न्यायालयात जाहीर केले.
दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात खजुराहो मंदिराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला कट्टर भक्त असल्याच्या निमित्ताने खडे बोल सुनावले होते. त्यावर सोशल मीडियात टीका झाली. त्यानंतर दुसऱया दिवशी सरन्यायाधीशांनी आपला कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ आता सरन्यायाधीशांनी सोशल मीडियापासून चार हात लांब राहण्याचा पवित्रा घेतला आहे. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घालण्यात आलेल्या बंदीने तेथे देशभरात अभूतपूर्व असंतोष निर्माण झाला. नेपाळमधील त्या हिंसक परिस्थितीचा संदर्भ देत सरन्यायाधीश गवई यांनी खुल्या न्यायालयात आपला निर्णय जाहीर केला. नेपाळमध्ये सोशल मीडियामुळे काय झाले हे आपण सर्वांनी बघितले आहे. आता मी कधीही, किमान 24 नोव्हेंबरला निवृत्त होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करणार नाही, अशी घोषणा सरन्यायाधीशांनी केली.