नाशिक कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती स्थापन, गिरीश महाजन यांच्याकडे समितीची सूत्रे

नाशिक जिह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तिढा  सुरू असताना  2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी राज्य सरकारने आज मंत्री समिती स्थापन केली. या समितीच्या प्रमुखपदी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळय़ाच्या नियोजनावर भाजपचा वरचष्मा ठेवला आहे

सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम तयार केला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मंत्री समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर सिंहस्थ कुंभमेळय़ाचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहील.

या मंत्री समितीत सदस्य म्हणून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे तर शिंदे गटाचे दादा भुसे आणि उदय सामंत या मंत्र्यांचा समावेश आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांना मंत्री समितीचे प्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळय़ाचे नियोजन होईल हे आता स्पष्ट झाले आहे.

कुंभमेळय़ावरून राजकीय आखाडा

मध्यंतरी कुंभमेळय़ाच्या नियोजनासंदर्भात गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळय़ाच्या तयारीबाबत माहिती मागवली होती. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळय़ावरून महायुतीत आखाडा रंगल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे मंत्री समितीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.