‘लश्कर’च्या अतिरेक्यानेच शरीफ सरकारला उघडे पाडले; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मुरीदके येथे झालेल्या नुकसानीचा व्हिडीओच दाखवला

ऑपरेशन सिंदूरमध्ये आमचे काहीही नुकसान झाले नाही, असे धडधडीत खोटे बोलणाऱ्या शाहबाज शरीफ सरकारला त्यांनीच पोसलेल्या ‘लश्कर ए तोयबा’ने उघडे पाडले. ऑपरेशन सिंदूर राबवताना हिंदुस्थानी लष्कराने मुरीदके येथील नष्ट केलेल्या दहशतवादी ठिकाणाचा व्हिडीओच दाखवला. पाकिस्तानी सरकारच्या मदतीने हा दहशतवादी कॅम्प पुन्हा बनवण्यात येत आहे.

हिंदुस्थान सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. यात मुरीदके येथील लश्कर ए तोयबाच्या मुख्यालयाचाही समावेश होता. हिंदुस्थानी लष्कराने हे मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचे पुरावेही दिले होते. मात्र पाकिस्तान सरकार, तेथील लष्कराने आमचे काहीही नुकसान झाले नाही, असे तुणतुणे वाजवले. लश्कर ए तोयबाचा कमांडर कसीम याने एक व्हिडीओ प्रसारित करून पाकिस्तान सरकारला बेनकाब केले.