देखणे न देखणे – एक तत्त्वी कळा…

>> डॉ. मीनाक्षी पाटील

संतांनी ज्या सगुणनिर्गुणाचा वेध आपल्या साहित्यातून घेतला तसा अखंड शोध चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा कलांमधून सातत्याने घेतला जातोय. कला, विज्ञान, विविध ज्ञानशाखा व एकूणच जगण्यातील व्यक्तअव्यक्ताचा धांडोळा घेणारे, दृश्यअदृश्याचा वेध घेणारे हे सदर.

हजारो वर्षांचा मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की वेगवेगळ्या कालखंडांमध्ये मानवी समाजसंस्कृतीच्या विकासासोबतच धर्मसंस्थेतही चढउतार होत गेलेले दिसतात. कोणतीही समाजसंस्कृती संपर्क, संवाद, संघर्ष, समन्वय अशा विविध अवस्थांमधील चढउतारातून क्रमाक्रमाने आकार घेत असते. त्यामुळे वेगवेगळ्या कालखंडातील धर्मसंस्थेचे स्वरूपही त्या त्या काळातील  समाजसंस्कृतीच्या वेगवेगळ्या अवस्थांशी सापेक्ष असे असते. कोणत्याही समाजसंस्कृतीच्या बौद्धिक, भावनिक आकांक्षांशी त्या त्या समाजसंस्कृतीचा धर्म निगडीत असतो, त्यामुळेच त्याची समीक्षा करण्याचे मुख्य साधन ‘मानवी बुद्धी’ हेच आहे. मानवी संस्कृतीच्या प्रदीर्घ इतिहासात प्रखर तर्कबुद्धीच्याआधारे माणसांनी वेळोवेळी आपल्या श्रद्धा,समजुती तपासून पाहिलेल्या दिसतात.

भारतीय विचारपरंपरेचा विचार करता असे दिसून येते की वेगवेगळ्या कालखंडात आपल्याकडेही प्रखर तत्त्वचिकित्सा (आणि पर्यायाने धर्मचिकीत्सा ) होत आली आहे. उपनिषदांमध्ये यज्ञ, देवता, ईश्वर, आत्मा यांसारख्या असंख्य विषयांवर अनेक तार्किक प्रश्न उपस्थित करीत तात्विक चर्चा केलेली दिसते. उदाहरणार्थ वेदकालीन यज्ञाची विधीप्रधानता उपनिषदकाळात चिकित्सकपणे जोखली जाऊन यज्ञविधीची आत्मज्ञानाच्या संदर्भातील प्रतिकात्मकता जास्त अधोरेखित झाली . याचप्रकारची तत्त्वचिकित्सा सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा (वेदान्त) या आस्तिक दर्शनांनी व चार्वाक, बौद्ध, जैन या नास्तिक दर्शनांनीही केलेली दिसते. या नऊ दर्शनांमधून मोक्षप्रधानता, धर्म/कर्मप्रधानता, भौतिकप्रधानता यासारख्या विचारसूत्रांवर फार गंभीरपणे विचार करण्यात आलेला आहे.

भारतीय तत्त्वविचारात मानवी बुद्धीच्या पलीकडे असलेल्या परम सत्याला जाणू पाहण्राया आध्यात्मिक विचाराला जसे महत्त्व आहे तसेच तर्कशुद्ध तत्त्वचर्चेला, ज्ञानमीमांसेला, इहवादी विचारप्रणालीलाही आहे. अगदी न्यायदर्शनाचा विचार केला तर असे दिसते की त्यात तर्काला, प्रमाणाला विशेष महत्व दिल्यामुळे त्याला भारतीय तर्कशास्त्र तर वैशेषिक दर्शनात विश्वाची सत्ताशास्त्राrय मीमांसा केलेली असल्यामुळे त्याला विश्वरचनाशास्त्र म्हणता येईल.या विविध दर्शनांमधून मानवी स्वभावातील द्वंद्वप्रेरणा, जीवनातील परिवर्तनशीलता, विश्वनिर्मितीमागील कार्यकारणभाव, ईश्वरी संकल्पना, विविध ज्ञानप्रक्रिया अशा विविध संकल्पनांवर सखोल चिंतन करण्यात आले आहे .भारतीय तत्त्वज्ञानाचा उदय उपनिषदांमध्ये झाला असे जरी मानले जात असले तरी त्याची तर्कशुद्ध रचना सूत्रग्रंथांच्या काळात झाली असे मानले जाते. प्राचीन भारतीयविचारपरंपरेत तत्त्वज्ञानाला ‘दर्शनशास्त्र’ तसेच अन्वेषण करून सिद्धान्त मांडणारे शास्त्र म्हटले आहे. थोडक्यात ‘दर्शन’ किंवा ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे सारे विश्व आणि त्यातील मानवी अस्तित्व याविषयीचे विचारपूर्वक केलेले चिंतन -मनन होय.

भारतीय विचारपरंपरेनुसार ‘तत्त्व’ हा शब्द सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे तत्त्वज्ञान म्हणजे जे सर्व पदार्थात किंवा जे सर्वव्याप्त आहे, सर्वांमध्ये आहे अशा सारतत्त्वाचे ज्ञान होय. तत्त्वज्ञानात जीवनाच्या सत्याचे यथार्थ दर्शन महत्वाचे असते. ‘दर्शन’ हा शब्द ‘दृश’ या धातूपासून बनलेला असून ‘दृश्यते यथार्थतत्वम् अनेन इति’ म्हणजे ज्याच्याद्वारे यथार्थ तत्त्व पाहिले जाते,  जाणले जाते, ते दर्शन होय. भारतीय विचारपरंपरेत साधनमार्गात दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीचा एक विशिष्ट असा अर्थ आहे. त्याचप्रमाणे प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या चिंतनाच्या एका विशिष्ट परिपक्व टप्प्यावर चिंतकाला जे युरेक्का युरेक्का असे स्फुरण होते ते म्हणजे दर्शन असाही एक अर्थ आहे. जे आपल्याकडे प्राचीन ऋषी -मुनी, भगवान गौतमबुद्ध, भगवान महावीर यांसारखे धर्म संस्थापक ते अनेक पौर्वात्य- पाश्चिमात्य विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत यांना घडलेले दिसते. अर्थात ‘दर्शन’ या शब्दाचा स्फूरणे, सुचणे असा एक काव्यात्म अर्थ जरी असला तरी  दीर्घकाळच्या चिंतनातून स्फुरलेल्या विचारांना जाणीवपूर्वक दिलेले काटेकोर रुप, सुव्यवस्थित मांडणी असाही दर्शन या शब्दाचा अजून एक अर्थ आहे.

थोडक्यात सारे विश्व आणि विश्वातील मानवी अस्तित्वाविषयी केलेल्या प्रदीर्घ काळच्या चिंतनातून चिंतकाला आकळलेले त्याचे स्वरूप म्हणजे दर्शन किंवा तत्त्वज्ञान होय.अर्थात वेगवेगळ्या चिंतकांना हे दर्शन वेगवेगळ्याप्रकारे झाल्यामुळे त्यांच्या मांडणीत विविधता पहायला मिळते. याचे कारण म्हणजे भारतात आदिम काळापासून अनेक वंशांचे,पंथांचे,धर्मांचे लोक एकत्र राहात असून काळाच्या ओघात त्यांच्यातील संवाद,संघर्ष, समन्वयातून वेगवेगळे विचारव्यूह आकाराला आलेले दिसतात. या विविध मानवसमुहांनी आपापल्या वेगवेगळ्या विचारव्यूहाद्वारे खरे तर एकाच अविभक्त विभत्तेषु अश्या तत्त्वाचा आपापल्या परीने शोध घ्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. या अखंड शोधप्रक्रियेत जीवनाच्या वैविध्यतेतील एकतेताच शोध अखंडपणे घेतला जात आहे. जगभरच्या वेगवेगळ्या धर्म विचारांमध्ये, दर्शनांमध्ये सगुण-निर्गुण, साकार-निराकार, मूर्त- अमूर्त, दृश्य-अदृश्य, ज्ञात- अज्ञात या विषयांवर ज्याप्रमाणे सतत उहापोह चाललेला दिसतो त्याचप्रमाणे विज्ञानाच्या विविध ज्ञानशाखांमध्येही यावर सातत्याने चिंतन- मनन आणि प्रयोग होताना दिसत आहेत.अनंत काळापासून मनुष्यजात ज्ञान-विज्ञानाच्या विविध ज्ञानशाखा, वैविध्यपूर्ण कला यांच्या माध्यमातून अखंडपणे अज्ञाताचा, दृश्य-अदृश्याचा निरंतर शोध घेत आहे. याविषयी सदर मालिकेतून आपण विचार करणार आहोत.