हिंदुस्थानला मिळाले सर्वात दुबळे पंतप्रधान! ट्रम्प यांच्या व्हिसा निर्णयावरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

हिंदुस्थानला सर्वात दुबळे पंतप्रधान मिळाले आहेत, अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १ लाख डॉलर (सुमारे ८८.१० लाख रुपये) इतकी वाढवण्याची घोषणा केली असून, ही वाढ २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. याचा मोठा फटका हिंदुस्थानी नागरिकांना बसणार आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी x वर एक पोस्ट करत ही टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाचे खासदार गौरव गोगोई यांनीही यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधानांचे रणनीतीक मौन आणि मोठमोठ्या बाता देशासाठी ओझे बनल्या आहेत.” त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत X वर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले, “एच1-बी व्हिसावरील अलीकडील निर्णयामुळे अमेरिकी सरकारने हिंदुस्थानातील प्रतिभावान व्यक्तींच्या भवितव्यावर आघात केला आहे. अमेरिकेत एका IFS महिला राजदूताचा अपमान झाला तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले धाडस मला अजूनही आठवते.”