
एच 1 बी व्हिसाच्या वार्षिक शुल्कात जबर वाढ करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हिंदुस्थानी आयटी कर्मचाऱयांवर बेकारीचे संकट कोसळले आहे, तर कुशल कर्मचारी गमावण्याच्या भीतीने अमेरिकी टेक कंपन्यांचीही गाळण उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, जेपी मॉर्गनसह बहुतेक बड्या कंपन्यांनी आपल्या एच 1 बी व एच 4 व्हिसा धारकांना रविवारच्या आत परत बोलावले आहे.
अमेरिका सरकारने घेतलेला एच 1 बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय 21 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तत्पूर्वी, पंपन्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारी डेडलाइनच्या आत बाहेरच्या देशातील कर्मचाऱयांनी अमेरिकेत पोहोचावे, असे ई-मेल संदेश कंपन्यांनी पाठवले आहेत. त्याचबरोबर, एच 1 बी व एच 4 व्हिसावर सध्या अमेरिकेत असलेल्या कर्मचाऱयांनी काही काळ देश सोडू नये, असेही कंपन्यांनी बजावले आहे.
71 टक्के व्हिसाधारक आपलेच!
ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. सध्या अमेरिकेतली एकूण एच-1 बी व्हिसाधारकांपैकी 71 टक्के हिंदुस्थानी आहेत, तर 11.7 टक्के व्हिसाधारकांसह चीन दुसऱया स्थानी आहे. इन्पहसिस, टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट, एचसीएल यांसारख्या हिंदुस्थानी आयटी कंपन्या अमेरिकेतील प्रोजेक्टसाठी कर्मचाऱयांना पाठवत असतात त्यांनाही आता फटका पडणार आहे.