
गणपतीपुळे जवळील भगवतीनगर रामरोड येथे एका विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळले. बिबट्या विहिरीतून मोटर पाईप आणि दोरीला धरून होता.वनविभागाने तात्काळ विहिरीला सुरक्षेसाठी जाळी लावली. त्यानंतर पिंजरा विहिरीत सोडून अर्ध्यातासात बिबट्याला जेरबंद केले.
आज सकाळी भूषण जयसिंग घाग यांचे मालकीचे विहिरीत बिबट्या पडलेला आढळून आला. सकाळी दहा वाजता भूषण जयसिंग घाग यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली.त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या पडलेल्या विहिरीची गोलाई सुमारे 16 फूट आणि खोली40 फूट असून 5 फूट उंचीवर पाण्याची पातळी होती. विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या मोटर पाईप ला व दोरीला धरून होता.वनविभागाने तात्काळ पिंजऱ्याला दोऱ्या बांधल्या.पाण्याची खोली कमी असल्यामुळे सुरक्षेसाठी विहिरीवर जाळे टाकून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद केला.
पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा बिबट्या हा मादी जातीचा असून अंदाजे १० ते १२ महिन्यांचा आहे हि कामगिरी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार,वनपाल न्हानू गावडे,वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम किरण पाचारणे यांनी केली.