
कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम असलेला सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या हाफ मॅड बाबुली मेस्त्राrच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. नवव्या दिवशीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. शनिवारी या चित्रपटाने तब्बल 2.65 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त ‘सॅकनिल्क‘ने दिले आहे. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 15 कोटींपर्यंत पोहोचले आहे.
कोकणातील निसर्गवैभव, मालवणी भाषेचा गोडवा त्यासोबतच कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्राrच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट मोठय़ा पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांच्या थिएटरबाहेर रांगा लागत आहेत.
शो वाढवण्याचा निर्णय
चित्रपटाचे एकूण कलेक्शन 15 कोटींपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता निर्मात्यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे. काही भागांमध्ये ‘दशावतार’चे शो उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर निर्मात्यांनी शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये खेळ वाढवण्यात आल्याची पोस्ट निर्मात्यांनी शेअर केली आहे.