
शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. नवरात्रीला ठिकठिकाणी रासगरब्याचे आयोजन केले जाते. यासाठी काही दिवस आधीपासूनच गरब्याची तयारी सुरु होते. अशातच मध्य प्रदेशातही मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जाते. तेथे दोन दिवस आधीपासून गरब्याची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान ही तयारी सुरु असताना एक चक्रावणारी घटना घडली आहे. गरबा खेळत असतानाच काही लोकांनी मिळून एका महिलेचे अपहरण केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला राजस्थानहून एका तरुणासोबत मंदसौरमध्ये आली होती. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात राहत होती. ती विवाहित असून कुटुंबापासून दूर राहण्याच्या तिच्या निर्णयामुळे तिच्या नातेवाईकांना तिच्यावर प्रचंड राग होता.
घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबातील लोक तिला शोधत शोधत मंदसौरमधील भावसार धर्मशाळेत पोहोचले. त्यावेळी ती महिला तेथे रासगरबा खेळत होती. यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला जबरदस्तीने तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला त्यांच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला पिस्तूलचा धाक दाखवत धर्मशाळेतून बाहेर नेले.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार धर्मशाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तातडीने शोध मोहिम सुरु केली. पोलिसांनी काही वेळातच अपहरण झालेली पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांना ताब्य़ात घेतले. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचेही त्यांनी सागितले.