
बंदी असतानाही विविध सण, उत्सव, मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट सुरूच आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेमुळे बेफाम झालेल्या बैलामुळे दोन लहान मुले जखमी झाली. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे घडलेल्या घटनेप्रकरणी डीजे मालक आणि मिरवणुकीचे आयोजक यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डीजेमालक गणेश मोहन भोंडवे (वय ४३, रा. वाजेवाडी ता. शिरूर, जि. पुणे) व मिरवणुकीचे आयोजक स्वप्नील शांताराम शेळके (वय ३४, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. हवालदार कृष्णा सूर्यभान व्यवहारे यांनी फिर्याद दिली आहे.
स्वप्नील शेळके यांनी बैलांची मिरवणूक आयोजित केलेली असताना, विनापरवाना डीजे लावला होता. मिरवणूक सुरू असताना डीजेच्या आवाजाने दोन बैल बेफान होऊन पळाले. काही वाहनांना धडकून बैल सैरावैरा पळू लागले. नागरिकांमध्ये बैल घुसले. आपल्या कुटुंबीयांसह आलेली दोन बालके बेफान बैलांच्या पायाखाली आल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बनकर हे करत आहेत.
सासवड : ढोल-ताशा किंवा गावाकडील पारंपरिक वाद्ये वापरून बैलपोळा सण साजरा करण्याची प्रथा हळूहळू लोप पावत चालली असून, बेसुमार फटाके उडवत व कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटात सध्या हा सण साजरा करण्याकडे कल वाढत आहे.
सासवड येथील काल (रविवारी) झालेल्या बैलपोळा सणात बहुतेक बैलमालकांनी डीजेचा सर्रास वापर केला. गणेशोत्सव काळात डीजेमुक्त मिरवणूक काढण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला काहीअंशी यश प्राप्त झाले; परंतु बैलपोळा सणात डीजेने अक्षरश: धुडगूस घातला.