पंचनाम्याची गरज नाही, शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, कर्जमाफी करा! आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे न करता तत्काळ मदत द्या, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, ती वेळ आता आली असल्याची आठवणही आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

मराठवाडय़ातील अनेक जिह्यांमध्ये शेतकऱयांचे जवळपास 50 टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. ही परिस्थिती अत्यंत दुःखद असून त्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

2339 कोटी रुपयांच्या निधीला केवळ मंजुरी देण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात त्या मदतीचे वितरण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, असे आदित्य ठाकरे यांनी सुचवले आहे. शेतकऱयांचे नुकसान 33 टक्पेंपेक्षा जास्त झाल्याने नियमानुसार पंचनाम्याची आवश्यकता नाही. सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही निकषांमध्ये त्यांना न अडवता मदत द्यावी, असा आग्रह आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आधीची 15 हजार कोटींची मदत थकीत

यापूर्वीही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या भरपाईची जवळपास 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारकडे थकीत आहे. त्या थकबाकीचेही लवकरात लवकर वितरण करण्याची आवश्यकता आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे.