ऐन नवरात्रोत्सवात कळवा, मुंब्रावासीयांचा घट रिकामाच; सापत्न वागणूक दिली जात असल्याचा महिलांचा आरोप,

ठाणे पालिका हद्दीत असलेल्या कळवा, मुंब्यात धो धो पावसातही पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. गणेशोत्सव कोरडा गेला, आता नवरात्रोत्सवातही पाण्याचा टिपूस नसल्याने संतप्त नागरिकांनी आज ठाणे पालिका मुख्यालयावर धडक दिली. ऐन नवरात्रोत्सवात कळवा, मुंब्रावासीयांचा घट रिकामाच असल्याने महिलांनी पालिका मुख्यालयात पाण्यासाठी आक्रोश केला. पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना गेली अनेक वर्षे कळवा, मुंब्याला सापत्न वागणूक का देता, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला.

कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासनाला साधी पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही. दरवर्षी करोडो रुपये खर्च करूनदेखील पाणी सोडण्यात दुजाभाव केला जास्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते
पालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्याने स्टेम, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई पालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी प्रत्येक महिन्याला जवळपास १५ कोटी या प्राधिकरणांना मोजावे लागतात.

पाणीपुरवठा कुठून आणि किती?
ठाण्याची लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. प्रतिदिन ६१६ दशलक्ष लिटर इतका पाण्याचा साठा मंजूर असताना प्रत्यक्षात ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेमकडून ११५ दशलक्ष लिटर आणि मुंबई पालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

मेट्रोसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर, कळवा, मुंब्रा पाणी नाही तर नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होत आहे. मग इतरांनी काय पाप केले आहे? तसेच इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे हक्काचे धरण मिळालेच नाही. दरम्यान, दसऱ्यापर्यंत पाणीटंचाई दूर न केल्यास आयुक्तांना दालनातच कोंडणार.
जितेंद्र आव्हाड,
( आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)