
वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली. अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला प्रथमच कसोटीत उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याआधी त्याने एकदिवसीय आणि टी-20 स्वरूपात उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. याचबरोबर देवदत्त पडिक्कल व एन. जगदीशन यांचाही निवडलेल्या 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. शुभमन गिल हा इंग्लंड दौऱ्यानंतर दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. इंग्लंड मालिकेत उपकर्णधार असलेला ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर असेल.
इंग्लंडच्या चौथ्या कसोटीत फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. सध्या तो बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसनात आहे. ध्रुव जुरेल आणि एन. जगदीशन यांचा विशेष यष्टिरक्षक म्हणून समावेश झाला असून, जुरेल पहिल्या पसंतीचा पर्याय मानला जात आहे. जसप्रीत बुमरालाही संघात स्थान देण्यात आले आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना (28 सप्टेंबर) आणि पहिली कसोटी (2 ऑक्टोबर, अहमदाबाद) यामध्ये केवळ तीन दिवसांचा फरक असला तरी बुमरा खेळण्यासाठी सज्ज असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले. इंग्लंड दौऱयावर गेलेल्या संघातून अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, आकाश दीप, अंशुल कम्बोज, अर्शदीप सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. पंतलाही दुखापतीमुळे स्थान मिळालेले नाही. ईश्वरन, आकाश दीप आणि कम्बोज यांचा विदर्भाविरुद्ध नागपूर येथे 1 ऑक्टोबरपासून होणाऱ्या इराणी कपसाठी शेष हिंदुस्थान संघात समावेश झाला आहे.
पंत जखमी झाल्यानंतर अंतिम कसोटीच्या तयारीसाठी बोलावलेले अक्षर पटेल, देवदत्त पडिक्कल आणि जगदीशन आता मुख्य संघाचा भाग आहेत. करुण नायरच्या वगळण्याबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले की, ‘आम्हाला करुणकडून अधिक अपेक्षा होत्या. पडिक्कल सध्या अधिक चांगला पर्याय आहे. दुर्दैवाने प्रत्येकाला 15-20 कसोटी सामने देणे शक्य नसते. पडिक्कलने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी दाखवली आहे. करुणकडून थोडी अधिक सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा होती.’
हिंदुस्थानातील गवताळ विकेट्सवर फिरकी गोलंदाजांना अधिक महत्त्व मिळणार असल्याने जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या तीन अष्टपैलूंसह कुलदीप यादवची निवड झाली आहे. नितीशकुमार रेड्डी हा वेगवान अष्टपैलू, तर बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे मुख्य वेगवान गोलंदाज असतील. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामने अनुक्रमे 2 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे आणि 10 ऑक्टोबरला दिल्लीत होणार आहेत.
हिंदुस्थानचा कसोटी संघ ः शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, बी. साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, नीतिशकुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, एन. जगदीशन (यष्टिरक्षक).