
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत आज शेतकऱ्यांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटला. ‘कर्जमाफी करा… कर्जमाफी करा…’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी थेट उठाव केला. ‘आमचे प्रचंड नुकसान झाले आहे, आधी कर्जमाफी द्या’ अशा घोषणा विखे यांचे भाषण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी दिल्या.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा आणि बँकेच्या क्यूआर कोड सेवेचा शुभारंभ आज झाला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, सुजय विखे, बाजीराव खेमनर, भानुदास मुरकुटे, अनुराधा नागवडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगर जिल्हा बँकेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडत आणि पवार यांचे नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये ‘‘जाणता राजा’ला बँकेची चिंता करायची आवश्यकता नाही, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत,’ असे सांगितले. विखे यांचे भाषण सुरू असतानाच सभागृहात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी ‘अगोदर आम्हाला न्याय द्या… कर्जमाफी द्या… कर्जमाफी द्या…’ अशा घोषणा देत विखे यांच्या भाषणात अडथळा आणला. तर, दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी, ‘आम्ही नियमित कर्ज भरूनही आम्हाला एक दमडीही मिळाली नाही त्याचं काय?’ असा सवाल काही शेतकऱ्यांनी केला. या गोंधळामुळे पालकमंत्री विखे यांनाही माघार घ्यावी लागली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीशी सूर जुळवत, ‘तुमची जी मागणी आहे, तीच माझीही मागणी आहे. कर्जमाफी दिलीच पाहिजे,’ असे जाहीर वक्तव्य त्यांना करावे लागले.
सभापती आमदार राम शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले. मात्र, भाषणातच शेतकऱ्यांनी कडवट सत्य त्यांच्या तोंडी आणले. राज्य सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे वास्तव शिंदेंना कबूल करावे लागले. ‘खरंच काहींना लाभ मिळाला नाही, काहींनाच मिळाला आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे,’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.
सभेत शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश करीत, ‘आम्ही नियमित कर्जफेड केली, तरी आम्हाला एक दमडीही मिळाली नाही. 50 हजार मिळणार म्हणाले, तेही मिळाले नाहीत,’ असे सवालांचा भडिमार केला. परिणामी, संपूर्ण सभागृह घोषणांनी दणाणले.
आता मी बँकेत लक्ष घालणार! – राम शिंदे
‘याअगोदर मी जिह्याचा पालकमंत्री होतो, मी कधीच जिल्हा सहकारी बँकेमध्ये लक्ष दिलेले नव्हते; पण आता अलीकडच्या काळामध्ये मला या बँकेमध्ये लक्ष द्यावे वाटते आणि मी निश्चितपणे लक्ष देणार आहे,’ असे सांगत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अनेकजणांवर निशाणा साधला.
सरसकट पंचनाम्याद्वारे शेतकऱ्यांना मिळणार मदत – पालकमंत्री विखे
‘नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी मोठय़ा संकटात सापडले असून, अशा काळात त्यांना आधार देण्याची हीच वेळ आहे,’ असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राज्य सरकारने 31 लाख शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केल्याचे सांगत, नगरमधील शेतकऱ्यांना सरसकट पंचनाम्यांद्वारे मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँकेचे नाव आता ‘अहिल्यानगर’
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असे पूर्वी बँकेचे नाव होते. आज या बँकेचे नाव बदलण्याचा ठराव करून ‘अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक’ असा करण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी 11 लाख
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, जिल्हा सहकारी बँकेने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी एक कोटी 11 लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.