
लेह-लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, लोकशाही, रोजगार या मागण्यांसाठी ‘जेन-झी’ने केलेल्या उग्र आंदोलनानंतर केंद्रातील मोदी सरकारने दमनशाही सुरू केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात नेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान लेह-लडाखमध्ये तिसऱया दिवशीही संचारबंदी कायम आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
लेह-लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा, स्थानिकांना रोजगार आदी मागण्यांसाठी सोनम वांगचुक हे तीन आठवडय़ांपासून उपोषणाला बसले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी ‘जेन-झी’ रस्त्यावर उतरली आणि हिंसक आंदोलन झाले. तरुणांनी लेहमधील भाजपचे कार्यालय जाळून खाक केले. या हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाला आणि 40 पोलीस अधिकाऱयांसह 80 जण जखमी झाले. हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आणि शांततेचे आवाहन केले. मात्र मोदी सरकारने दडपशाही सुरूच ठेवली. वांगचुक यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लावला. गुरुवारी वांगचुक यांच्या ‘स्टुडंट्स एज्युकेशन ऍण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ या संघटनेला एफसीआरए परवाना रद्द केला. तसेच हिमालयात ‘इन्स्टिटय़ूट ऑफ ऑल्टर्नोटिव्हज लडाख’ या स्वयंसेवी संस्थेची चौकशी सुरू केली. आज लडाखचे पोलीस महानिरीक्षक एस. डी. सिंग जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वांगचुक यांना अटक करून अज्ञातस्थळी नेले. सोनम वांगचुक हे दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार होते. मात्र पोलिसांनी दडपशाही करत ‘एनएसए’ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
इंटरनेट बंद, संचारबंदी कायम
लेह-लडाखमध्ये मोदी सरकारची दमनशाही सुरूच आहे. इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तिसऱया दिवशीही शाळा-कॉलेज बंद आहेत. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वांगचुक यांच्या अटकेनंतर लडाखमध्ये तीक्र पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
देश कसा चालवला जातो हे लोकांना कळेल
सोनम वांगचुक यांनी अटकेची भीती आधीच व्यक्त केली होती. लडाखसाठी आवाज उठवल्यामुळे अटक होणार असेल तर आनंदच होईल असे ते म्हणाले होते. मी अटकेसाठी तयार आहे. मी त्यापलीकडे विचार करत आहे. मला कोणत्याही भ्रमात राहायचे नाही. जर मला अटक झाली तर लोकांना देश कसा चालवला जात आहे याची जाणीव होईल, असेही त्यांनी सांगितले होते.
स्थिती आणखी चिघळेल
वांगचुक यांच्या अटकेनंतर लडाखमधील स्थिती अधिक चिघळण्याची शक्यता एलएबीचे कायदेशीर सल्लागार हाजी गुलाम मुस्तफा यांनी व्यक्त केली. वांगचुक हे शांततेचे पुरस्कर्ते आहेत. अशा कारवाईने लोकशाही, पूर्ण राज्याचा दर्जा यासाठी चाललेले आंदोलन थांबणार नाही, असे ते म्हणाले.