
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एजंटची 44 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सरोश आर मोमीन असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
मालवणी येथे राहणारे तक्रारदार हे इस्टेट एजंट आहेत. एप्रिल महिन्यात ते घरी होते. तेव्हा त्यानी एका जाहिरातीला फॉलो केले होते. त्यानंतर त्याच्या व्हॉट्सऍपवर एक लिंक आली. ती उघडल्यानंतर त्याना एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. गुंतवणुकीवर परतावा मिळाला म्हणून काहींनी प्रॉफीट मिळाल्याचे स्क्रीन शॉटदेखील शेअर केले होते. त्यामुळे त्याना त्याच्यावर विश्वास बसला.
एका महिलेने त्याना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. महिलेने एक लिंक पाठवून बँक खात्याची माहिती अपलोड करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार याने 44 लाख रुपयांची गुंतवणूक केली. केलेल्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळाल्याचे त्याना सांगण्यात आले. त्यामुळे त्याने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रारदार याच्यावर 11 लाख 30 रुपयांचे कर्ज असल्याचे भासवले. ती कर्जाची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर उर्वरित रक्कम काढता येईल, असे त्याना सांगितले. महिलेने त्याना कर्जाची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. त्याला तक्रारदार याने नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सरोशला ताब्यात घेतले. फसवणुकीची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग झाली होती. त्याने बँक खाती उघडून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.