
>> विशाल फुटाणे
शिलालेख हे प्राचीन संस्कृतीचे मूक साक्षीदार. या शिलालेखांचा अभ्यास करताना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक असे अनेक संदर्भ सापडतात. या संदर्भांचे विश्लेषण करणारे, अधिक माहिती देणारे हे सदर.
तिरुपतीच्या डोंगरावर 16व्या शतकात कोरलेला एक शिलालेख आपल्याला केवळ मंदिर प्रशासनाचा इतिहास सांगत नाही, तर तो आजच्या काळातही झणझणीत संदेश देतो. हिंदू पदपातशाही निर्माण करणाऱ्या विजयनगर साम्राज्याने केवळ राजकीय सामर्थ्यच नव्हे, तर सामाजिक व आर्थिक शिस्त राखण्याची जबाबदारीही स्वतवर घेतली होती. या शिलालेखात स्पष्ट नोंद आहे की, नंबी सिर्रप्पैयन नावाचा ब्राह्मण पुजारी, जो गोविंदराजस्वामी मंदिरात कार्यरत होता. त्याने मंदिराचे दागिने चोरले. मंदिर म्हणजे श्रद्धेचे केंद्र, भक्तांच्या दानावर चालणारी संस्था आणि त्या संस्थेच्या रक्षणाची जबाबदारी पुजाऱयांवर होती. पण जेव्हा हाच पुजारी गैरव्यवहार करतो, तेव्हा त्याच्या सामाजिक दर्जामुळे त्याला अभय देण्याऐवजी विजयनगरच्या राजाने थेट कारवाई केली.
इ. सन 1524 मधील 12 जानेवारी ही तारीख. सालुव नरसिंहराय महाराजांनी त्या पुजाऱयाची जमीन जप्त केली आणि ती मंदिराकडे सोपवली. ही जागा पुढे व्यासतीर्थ नावाच्या मध्वाचार्य परंपरेतील महान तत्त्वज्ञाला मठ स्थापनेसाठी दान करण्यात आली. म्हणजे भक्तांच्या पैशांचा अपहार करणाऱयाची संपत्ती पुन्हा भक्तीच्या कार्यासाठी वापरली गेली. या घटनेतून विजयनगरच्या प्रशासनातील पारदर्शकता, न्याय आणि राजसत्तेची जबाबदारी यांचे उत्तम दर्शन घडते. विशेष म्हणजे शिलालेखात हा गुन्हा स्पष्ट शब्दांत नोंदवलेला आहे तो ही नावासकट.
आजच्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे बहुधा लपवली जातात, अथवा सत्ताधाऱयांच्या आश्रयाखाली दडपली जातात, पण त्या वेळी दगडावर कोरून, काळाच्या कसोटीवर टिकेल असा पुरावा ठेवला गेला. हा फरक लक्षवेधी आहे. विजयनगरचे राजे केवळ धर्मसंरक्षक नव्हते, तर ते मंदिरांच्या संपत्तीवर देखरेख ठेवणारे, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारे आणि समाजात न्याय प्रस्थापित करणारे होते. मंदिरांची संपत्ती ही केवळ दगडातली मूर्ती नव्हे, तर ती जनतेच्या श्रद्धेची, घामाची, विश्वासाची पुंजी होती. तिचा अपहार झाल्यास समाजाचा आत्मा दुखावला जाईल, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी पुजारी असला तरी त्याला शिक्षा देण्यात कसलीही कुचराई केली नाही. हा शिलालेख आजच्या भारतासाठी एक आरसा आहे. विजयनगरच्या दगडावर कोरलेल्या अक्षरांतून आपल्याला दिसते की, सर्वोच्च राजसत्ता भ्रष्टाचाराला अभय देत नाही, तर त्यावर कारवाई करून जनतेच्या संपत्तीचे रक्षण करते. शतकानुशतके मागे पाहिले तर दिसते की, विजयनगर साम्राज्याने धर्म आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधला होता. धर्मसंस्था ही पवित्र असली तरी तिच्यावर नियंत्रण आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. म्हणूनच मंदिराचा पुजारी भ्रष्टाचार करताच त्याची जमीन जप्त करून ती पुन्हा धर्मकार्यासाठी वापरण्यात आली. प्रामाणिकता आणि जबाबदारी हाच धर्माचा खरा अर्थ आहे आणि तोच राजकारणाचा पाया असावा.
मंदिरातील चोरी म्हणजे श्रद्धेचा अपमान. ती जमीन परत धर्मकार्यासाठी लावून समाजाला न्याय देण्यात आला. पांतीच्या दिवसाचा अर्थात पुण्य मुहूर्ताचा उपयोग राजाने न्याय करण्यासाठी केला. खरे तर पांतीला दान केल्याने पुण्य अक्षय होते असे मानले जाते, पण हे दान फक्त स्वेच्छेचे नव्हते; ते भ्रष्टाचारातून मिळवलेली मालमत्ता जप्त करून पुन्हा समाजासाठी वापरण्याचा धार्मिक आणि राजकीय निर्णय होता. यातून दिसते की, विजयनगर राजसत्ता धर्म आणि न्याय यांची सांगड घालत होती. पांतीचा दानधर्म हा केवळ धार्मिक विधी न राहता भ्रष्टाचार रोखण्याचा आणि समाजाची श्रद्धा जपण्याचा राजकीय व सामाजिक दस्तऐवज ठरतो.
विजयनगरच्या शिलालेखाने हे अधोरेखित केले, पण आज आपण हे विसरलो आहोत. त्यामुळेच तिरुपतीचा हा शिलालेख केवळ एक पुरातन दस्तऐवज नाही, तर आजच्या राजसत्तेला एक स्पष्ट संदेश आहे की, सत्ता म्हणजे संरक्षण, न्याय आणि जबाबदारी. जर सत्ताधाऱयांनी भ्रष्टाचाऱयांना अभय दिले, तर समाजाचा विश्वास ढासळतो, श्रद्धा उद्ध्वस्त होते आणि धर्माचा पाया खिळखिळा होतो. जनतेच्या पैशांचे, जनतेच्या विश्वासाचे रक्षण करणारी सत्ता हाच खरा धर्मसंरक्षक आहे, हे विजयनगरच्या इतिहासाने शिकवले आणि हीच शिकवण आजच्या भारताला अत्यंत आवश्यक आहे. हा शिलालेख `तिरुपती देवस्थानम शिलालेख’ या ग्रंथात असून ज्याला आंध्र प्रदेश पुरातत्व विभागाने (Tirumala trupati devasthanam ) प्रकाशित केले आहे.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)
[email protected]