
>> उदय जोशी
पावसाच्या थैमानाने मराठवाडा उद्धवस्त झाला आहे. त्यात जायकवाडी प्रकल्पामध्ये आवक वाढल्याने गोदावरीच्या नदीपात्रात अडीच लाख क्युसेस पाणी सोडले जात आहे. बीड जिल्ह्यातील गोदाकाठावर वसलेल्या ६२ गावांसाठी आजची रात्र वैर्याची असणार आहे. गावागावामध्ये दवंडी दिली जात आहे. सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. जायकवाडीतून येणार्या अडीच लाख क्युसेस पाण्यामध्ये बिंदुसरा, सिंदफणा, कुंडलिकाच्या एक लाख क्युसेस पाण्याची भर पडणार असल्याने पूरपरिस्थिती गंभीर होणार आहे. पाण्याचा विसर्ग वाढवला तर असंख्य गावांचे स्थलांतर करावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही तुडुंब भरून वाहत आहेत. सिंदफणा प्रकल्पातून ९२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. अप्पर कुंडलिका प्रकल्पातूनही १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सध्या माजलगाव प्रकल्पातूनही ३५ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. माजलगाव प्रकल्पातून सोडलेले पाणी माजलगाव तालुक्यातील सांडसचिंचोली येथे गोदावरी पात्रामध्ये समाविष्ट होते. यातच गोदावरीला मोठा पूर आल्याने जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक क्षणाक्षणाला वाढत असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदावरीच्या पात्रात अडीच लाख क्युसेस पाणी सोडले जात आहे. ताशी चार ते पाच कि.मी.वेगाने हे पाणी प्रवाहित आहे. अडीच लाख क्युसेस पाणी सोडले जात असल्याने गोदाकाठावर पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. बीड जिल्ह्यातील गोदाकाठावरील ६२ गावांसाठी आजची रात्र वैर्याची असणार आहे. गेवराई, माजलगाव आणि परळी या तीन तालुक्यातून गोदावरी पुढे परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीपासून बोरगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, राजापूर, पांढरवाडी, रामपुरी, पुढे गंगामसला, ढालेगाव असा या नदीचा प्रवास बीड जिल्ह्यातून होतो. जेव्हा जेव्हा दोन लाखापेक्षा जास्त क्युसेसचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले तेव्हा तेव्हा पूरस्थिती गंभीर झालेली आहे. यापूर्वी २००६ साली आणि २०१६ साली गोदावरी पात्रात अडीच ते तीन लाख पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी या ६२ गावांमध्ये पुराने थैमान घातले होते. हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली गेली होती. तशीच परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे. सांडसचिंचोलीपर्यंत अडीच ते तीन लाख क्युसेस पााणी गोदापात्रात असणार आहे. तेथून पुढे साडेतीन लाखापेक्षा जास्त क्युसेस पाणी गोदावरीमध्ये समाविष्ट होणार असल्याने पाण्याचा वेग मंदावू शकतो आणि गेवराई, माजलगाव तालुक्यातील गोदाकाठावरील गावामध्ये पुराचे पाणी घुसू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. गावागावामध्ये दवंडी दिली जात आहे. खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आपल्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी सतर्क केले जात आहे. एकंदरीत आजची रात्र ही गोदाकाठासाठी वैर्याची असणार आहे.


































































