
राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे, शेतकऱ्याचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे, संसार उघडय़ावर आला आहे. बळीराजाला आता मदतीची व आधाराची गरज आहे. मात्र सरकार या संकटाकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप करतानाच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत द्या अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिला.
मे महिन्यापासूनच पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे तरीही अद्याप राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणताही अहवाल केंद्र सरकारला अद्याप पाठवलेला नाही, असा आरोप सपकाळ यांनी केला. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा व दुःख जाणून घेतले व भरीव मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे, पण सरकार या संकटाकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले, पण रिकाम्या हातानेच परतले. या भेटीत त्यांना शेतकऱ्यांपेक्षा सुरजागडच्या खाणीतच जास्त रस होता आणि त्यांनी पंतप्रधानांशी चर्चाही त्याच विषयावर केली, असे सपकाळ म्हणाले.






























































