वेळ चुकली आणि काळाने डाव साधला! थलपती विजयच्या सभेत नेमकं काय घडलं? तामीळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम

तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 39वर पोहोचला आहे. शेकडो जखमींवर उपचार सुरू आहेत. यावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू असताना आता चेंगराचेंगरीमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. सभेची वेळ चुकीची सांगितली गेल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

तामीळनाडूच्या प्रभारी पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आज माहिती दिली. त्यानुसार थलपती विजयच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने करूर येथील सभेसाठी दुपारी 3 ते रात्री 10ची वेळ मागितली होती. प्रत्यक्षात पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर थलपती विजय दुपारी 12 वाजेपर्यंत पोहोचेल, असे जाहीर करण्यात आले. तिथेच गफलत झाली. विजयला जास्तीत जास्त जवळून पाहता यावे यासाठी लोक सकाळी सात वाजल्यापासूनच जमायला लागले. सुमारे 10 हजार लोकांची गर्दी होईल, असा आयोजकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात 27 हजार लोकांनी गर्दी केली. त्यामुळे जागा अपुरी पडली. पोलिसांनाही गर्दी नियंत्रणात ठेवता आली नाही. त्यातच विजयचे भाषण सुरू झाल्यावर लोक स्टेजच्या दिशेने सरकू लागले. त्यातून रेटारेटी आणि चेंगराचेंगरी झाली व पुढील अनर्थ घडला.

सभेच्या ठिकाणी तब्बल 7 तास उशिरा पोहोचला. सकाळी सातपासून थांबलेले लोक कडक उन्हात होते. त्यांच्यासाठी जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी सोय नव्हती. त्यामुळे लोक आधीच थकलेले होते. गर्दी होऊन श्वास गुदमरल्याने ते लगेच बेशुद्ध पडले. त्यात अनेक जण दगावले.

हायकोर्टात उद्या सुनावणी

करूरच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी थलपती विजयच्या पक्षाने मद्रास उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी पक्षाने केली होती. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विजयकडून 20 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

करूरमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा थलपती विजय याने केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये व औषधोपचारांचा खर्च केली जाईल, असे त्याने स्पष्ट केले आहे.