बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देणारा ग्रामविकास अधिकारी बडतर्फ

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने एका बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला होता. बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देण्याऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे आता ग्रामपंचायतीच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांग्लादेशींना ताब्यात घेतले होते. त्यावेळी तपासात एका बांग्लादेशी नागरिकाकडे शिरगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या जन्मदाखला आढळला होता. ती बांग्लादेशी व्यक्ती काही काळ रत्नागिरीत वास्तव्याला असताना शिरगाव ग्रामपंचायतीमधून हा जन्मदाखला दिला गेल्याचे उघडकीला आले होते. त्यावेळी शिरगावचे ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके होते.चौकशीनंतर सर्वप्रथम त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून झालेल्या चौकशीत सावके दोषी आढळले. रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने सावके यांना बडतर्फ केले आहे.

लोकप्रतिनिधींवर अद्याप कारवाई नाही

ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी शिरगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याबद्दल ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत जन्मदाखला कसा देऊ शकते, ग्रामपंचायतीनी कोणती कागदपत्रे पाहिली याबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे.