घोषणांचा महापूर, मदतीचा पत्ता नाही; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

अतिवृष्टीमुळे राज्यावर गंभीर संकट ओढवले असताना महायुती सरकारकडून फक्त घोषणांचा पूर आला आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत अद्याप पोहोचलीच नाही, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. सरकार आपल्याच मस्तीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पूर परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे; पण राज्यातील शेतकऱयांचा आवाज मात्र सरकारपर्यंत पोहोचत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई आणि कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी आहे. ब्रँडिंग, सीएसआर किंवा जनतेकडून मदत सुरू राहील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही हे दुर्दैव आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पीएम केअरचा पैसा वितरीत करा

पीएम केअरचा पैसा कुठे गेला, हा सवाल शिवसेना सातत्याने करत आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या संकटात पीएम केअर फंडचा पैसा वापरावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. सरकार पीएम केअरचा पैसा वितरीत करत असेल तर त्यांचे होर्डिंग आणि फोटो लावू, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुंबईत संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, शीव येथील पूल, टिळक पूल यांची कामे योग्य नियोजनाअभावी अद्याप पूर्ण झालेली नाहीत. डिलाईल रोडच्या पुलाला इतका विलंब झाला होता की त्याचे नाव आम्ही डिले रोड ठेवले होते. नवरात्रोत्सव आणि दिवाळीचा विचार करून कामे हाती घ्यावीत, अशी विनंती शिवसेनेने केली होती, मात्र एमएमआरडीए आपल्याच घाईत आहे.

शेतकऱ्यांच्या पैशांची निवडणुकीसाठी उधळपट्टी

गेल्या अडीच वर्षांतले शेतकऱयांच्या मदतीचे 15 हजार कोटी अद्याप थकीत आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर शरसंधान केले. त्या पैशांची निवडणुका असलेल्या राज्यात उधळपट्टी सुरू आहे, असे सांगत त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये वर्षानुवर्षे भाजपची सत्ता असून आता ते मते विकत घेण्यासाठी पैशांची उधळपट्टी करत असतील जर जनेतेने काय करायचे, असा संतप्त सवालही त्यांनी केला.