
सलामीवीर प्रियांश आर्या (101) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (110) यांच्या शानदार शतकांमुळे हिंदुस्थान ‘अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा 171 धुव्वा उडवला. अनौपचारिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने आपला विजयोत्सव सुरूच ठेवताना एकदिवसीय मालिकाही आपल्या खिशात घालण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
मंगळवारी पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता, परंतु राखीव दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अखेर मालिकेची सुरुवात झाली. हिंदुस्थान ‘अ’ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 413 धावांचा डोंगर उभारला होता तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ 33.1 षटकांत 242 धावांवरच ढेपाळला आणि यजमानांनी धुव्वादार विजयाची नोंद केली.
हिंदुस्थान ‘अ’ चा आक्रमक डाव
हिंदुस्थान ‘अ’ च्या पहिल्या सहा फलंदाजांचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा जास्त होता आणि त्यापैकी पाच जणांनी अर्धशतके ठोकली, हे हिंदुस्थानच्या डावाचे खास वैशिष्टय होते.
आर्या आणि प्रभसिमरन सिंग, ज्यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी धमाकेदार सलामी जोडी म्हणून खेळ केले होते, यांनी पुन्हा एकदा दमदार भागीदारी करत 20.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 135 धावा जोडल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची सूत्रे हाती घेतली आणि 12 चौकार व 4 षटकारांसह 110 धावा झळकावल्या.
या मालिकेसाठी मूळतः रजत पाटीदारला कर्णधार करण्यात आले होते, परंतु तो सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या इराणी कपमध्ये ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. अय्यरने सध्या पाठीच्या दुखापतीमुळे लाल चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे, पण तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी उपलब्ध आहे.
रियान पराग (67) आणि आयुष बदोनी (50) यांनी अर्धशतके ठोकत हिंदुस्थान Aला प्रचंड धावसंख्या गाठण्यास मदत केली.
47 व्या षटकात अय्यर बाद झाल्यावर हिंदुस्थान ‘अ’ ची धावसंख्या 380/4 होती, पण बदोनी आणि निशांत सिंधू यांनी झटपट धावा काढत स्कोर 400 च्या पुढे नेला.
























































