हिंदुस्थान हा फुटबॉलप्रेमींचा देश, लिओनेल मेस्सीकडून कौतुकोद्गार; हिंदुस्थान दौऱ्याची केली घोषणा

हिंदुस्थानातील गोट टूरमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा जगातील स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गुरुवारी केली. हिंदुस्थान हा फुटबॉलप्रेमींचा देश असून पुन्हा या देशाचा दौरा करायला मिळणे हा माझा सन्मान असल्याचे मेस्सी म्हणाला. 14 वर्षांपूर्वी मेस्सी हिंदुस्थानात आला होता.

हिंदुस्थान हा खास देश आहे. 14 वर्षांपूर्वी मी हिंदुस्थानचा दौरा केला होता. त्यावेळच्या आठवणी आजही लक्षात आहेत. तेथील चाहते विलक्षण असल्याचे मेस्सी म्हणाला.

हिंदुस्थान हा फुटबॉल चाहत्यांचा देश आहे. येथील नव्या पिढीतील चाहत्यांना भेटायला मला आवडेल. त्यांच्यासोबत फुटबॉलशी संबंधित चर्चा करायला मला अवडतील, असे मेस्सी म्हणाला.

15 ऑगस्ट रोजी आयोजकांनी मेस्सीच्या हिंदुस्थान दौऱ्याची घोषणा केली होती. गुरुवारी स्वतः मेस्सीने प्रथमच व्यक्त होत हिंदुस्थान दौऱ्यावर शिक्कामोर्तब केले.

कोलकातामधील मेस्सीचा कार्यक्रम सॉल्ट लेक स्टेडियममध्ये होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. हेच स्टेडियम 2011 मध्ये मेस्सीच्या हिंदुस्थान भेटीचे साक्षीदार होते.

कोलकात्यात मेस्सी गोट कॉन्सर्ट्स आणि गोट कपसाठी मैदानात उतरेल. त्यावेळी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, बायचुंग भूतिया आणि लिएंडर पेस उपस्थित असतील.

13 डिसेंबरला दौऱ्याला सुरुवात

13 डिसेंबरपासून मेस्सीच्या हिंदुस्थान दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी मेस्सी कोलकाता, अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांना भेट देईल. 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मेस्सीचा हा दौरा संपेल.

या कार्यक्रमांत होणार सहभागी

दौऱ्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी अनेक कार्यक्रमांत सहभागी होईल. कॉन्सर्ट्स, चाहत्यांशी भेट,  खाद्य महोत्सव, फुटबॉल मास्टरक्लासेस आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पॅडल टेनिसचे प्रात्यक्षिक यांचा यात समावेश असेल.