
कसोटी सामना म्हणजे संयमाचा खेळ, पण हिंदुस्थानच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजला दाखवून दिले की, संयमानेही वादळ उठवता येते! पहिल्या दिवशी हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी विंडीजचा फडशा पाडून 162 धावांवर गुंडाळले होते आणि दुसऱ्या दिवशी राहुल-जुरेल-जाडेजाने असा बॅटचा फटकारा दिला की, पॅरिबियन गोलंदाजांचे तोंडावर हात गेले. दिवसअखेर हिंदुस्थान 5 बाद 448 अशा धावांच्या डोंगरावर उभा असून 286 धावांची गगनचुंबी आघाडी घेतलीय. अहमदाबाद कसोटी हिंदुस्थानने खिशात घातलीच आहे आणि फक्त प्रश्न एकच उरला आहे की, विंडीजचा मरतुकडा संघ किती मोठय़ा डावाचा फरकाने हरतोय.
विंडीजची सध्याची परिस्थिती पाहता ते हिंदुस्थानात दोन-तीन दिवसांतच हरायला आलेत, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. अहमदाबादमध्येही त्याच दिशेने ते सुसाट धावत सुटलेत. गुरुवारी हिंदुस्थानच्या वेगवान माऱ्यापुढे विंडीजच्या फलंदाजांची तारांबळ उडाली होती तर आज त्यांचे गोलंदाज रक्तबंबाळ झाले. हिंदुस्थानी फलंदाजांना रोखण्यात ते खूपच कमी पडले. त्यांच्या बोथट गोलंदाजीचा सर्वांनीच खरपूस समाचार घेतला. त्यामुळे तीन-तीन शतकांचा पाऊस एकाच दिवशी बरसला.
राहुलचे 9 वर्षांनंतर मायभूमीवर शतक
नऊ वर्षांनी हिंदुस्थानच्या भूमीवर राहुलच्या बॅटने शतकाची फुलबाग फुलवली. शुभमन गिलसोबत 98 धावांची भागीदारी रचत त्याने 190 चेंडूंवर शतक ठोकले. गिलने 50 धावा केल्या पण तो जास्त टिकला नाही. राहुलने मात्र 12 चौकारांची सरबत्ती करत 100 धावांवर झेंडा रोवला आणि लगेचच वॉरिकनला झेल देऊन परतला. विशेष म्हणजे तब्बल 3211 दिवस म्हणजेच नऊ वर्षांनंतर राहुलच्या शतकाचा हिंदुस्थानात पुनर्जन्म झाला. 2016 साली त्याने इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत 199 धावांची खेळी केली होती. आज त्याने शतक पूर्ण होताच आपले काम झाले, आता दुसऱ्यांना करू दे’ अशा थाटात तो निघून गेला.
जुरेल–जाडेजाची धडाकेबाज भागी
राहुल गेल्यावर जुरेल आणि जाडेजा मैदानावर उतरले आणि सामना हिंदुस्थानच्या खिशात टाकला. जुरेलने आपल्या कारकीर्दीतले पहिलेच कसोटी शतक साजरे करताना 12 वा यष्टिरक्षक शतकवीर होण्याचा मान मिळवला. दोघांनी मिळून 205 धावांची भागीदारी उभी केली. त्यांच्या भागीने हिंदुस्थानचा मोठा कसोटी विजय दुसऱ्याच दिवशी निश्चित केला.
जाडेजाची ‘तलवारीची’ झुंजारकला
जुरेल परतल्यावर जाडेजाने गिअर बदलला आणि वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना चोप चोप चोपले. 6 चौकार, 5 षटकारांच्या साथीने त्याने आपल्या सहावे कसोटी शतक ठोकले. शतकानंतर नेहमीच्या ‘तलवारबाजीच्या’ अंदाजात बॅट फिरवत त्याने आपला शतकानंद साजरा केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जाडेजा 104 तर वॉशिंग्टन सुंदर 9 धावांवर खेळत होते.