
>> प्रतीक राजूरकर
मूळच्या श्वानप्रेमी असलेल्या जेन गुडाल यांनी सहा दशकांहून अधिक काळ चिंपांझींवर केलेल्या संशोधनाने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. बालपणी श्वानांचे निरीक्षण करण्याचा अनुभव डॉ. जेन यांना उपयुक्त ठरला. कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना डॉ. जेन यांना चिंपांझींवर संशोधनाची संधी प्राप्त झाली. चिंपांझीच्या बाबतीत सृष्टीआड असलेल्या अनेक सवयी, स्वभाव त्यांनी जगाच्या दृष्टीस आणून दिले. चिंपांझी हे केवळ शाकाहारी नाहीत, तर प्रसंगी मांसाहार करतात, चिंपांझीचे आपापसातील टोळीयुद्ध, अनाथ चिंपांझीच्या पिलांना प्रौढ चिंपांझी दत्तक घेतात या आणि यांसारख्या अनेक बाबतीत डॉ. जेन यांच्या संशोधनाने चिंपांझींच्या नव्या संस्कृतीची जगाला ओळख पटली. चिंपांझींना क्रमांक न देता डॉ. जेन यांनी त्यांचे बारसे केले. डॉ. जेन यांच्या मते त्यांना नावे दिल्याने ते मानवाच्या अधिक जवळ असल्याच्या संदेशातून संवर्धनाला बळकटी येईल. जगातल्या 21 देशांत चिंपांझींचे अस्तित्व आहे. मूळच्या ब्रिटिश असलेल्या डॉ. जेन यांनी संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून केलेले कार्य अतुलनीय ठरले. त्यांच्या कार्याची दखल घेत 2019 साली ‘टाइम्स’ मासिकाने डॉ. जेन यांची गणना जगातील प्रभावशाली व्यक्तीत केली. चिंपांझींच्या पशुतत्त्वातील गुणदोष स्वीकारत डॉ. जेन यांनी केलेले कार्य म्हणूनच अनन्यसाधारण ठरते. आपली आई, मुलगी, नात यांच्या समवेत अनेक महिने डॉ. जेन या चिंपांझींच्या अधिवासात वास्तव्य करायच्या. चिंपांझींच्या पिलांना कडेवर घेतलेली, चिंपांझींना दिलेले आलिंगन असे त्यांचे अनेक भावनिक व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या मायेची दखल घेत त्यांना शांतिदूत या उपाधीने गौरविले. जगाच्या एका कोपऱ्यात चिंपांझी संवर्धन केलेल्या डॉ. जेन यांनी एकनिष्ठेने केलेल्या कार्याचा त्यांच्या पश्चात अनेक शतके जगभरात नावलौकिक कायम राहील.
अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार गॅरी लार्सन यांनी 1987 साली एक व्यंगचित्र रेखाटले. एका चिंपांझीची पत्नी तक्रारीच्या सुरात पती चिंपांझीला म्हणते, ‘‘तुम्ही माझ्याऐवजी एका विशिष्ट प्राईमाटॉलॉजिस्ट (Primatologist) डॉ. जेन यांच्या समवेत अधिक वेळ घालवता. व्यंगचित्राने डॉ. जेन अतिशय आनंदी झाल्या. व्यंगचित्र प्रकाशित झाले तेव्हा डॉ. जेन चिंपांझींच्या अधिवासात होत्या. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा चिंपांझींच्या अधिवासात प्रवेश झाला तो अखेरपर्यंत कायम होता. विविध पुस्तके, संस्था, व्याख्याने या माध्यमांतून त्यांनी जगाला संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. 1957 सालापासून डॉ. जेन आणि चिंपांझी यांचे अतूट नाते अधिकच वृद्धिंगत होत गेले. डॉ. जेन आणि चिंपांझी हे समीकरण निसर्गाने दिलेले वरदान ठरले. भविष्यात चिंपांझी यांचा विचार करताना डॉ. जेन यांचे स्मरण प्रत्येकाला होईलच इतके भरीव योगदान डॉ. जेन यांचे चिंपांझी संवर्धनातील आहे. टांझानियाच्या प्रदेशात डॉ. जेन सुरुवातीला गेल्यावर चिंपांझी त्यांना बघून दूर पळत होते. कारण चिंपांझींना श्वेतवर्णीय व्यक्ती बघण्याची सवय नव्हती असे खुद्द डॉ. जेन यांनी एका मुलाखतीत सांगितले. काही वर्षांनी पुढे एका चिंपांझीला त्यांनी शेंगदाणा दिला. त्याने तो फेकून दिला आणि हळुवार आणि अलगदपणे ‘डेव्हिड’ नाव दिलेल्या चिंपांझीने डॉ. जेन यांची बोटे कुरवाळली. आपल्या भावना प्रकट करण्याची चिंपांझींची ही पद्धत डॉ. जेन यांनी शब्दांविना ओळखली. सुरुवातीला दूर पळून जाणारे चिंपांझी कालांतराने डॉ. जेन यांच्या समवेत मिसळून गेले आणि आलिंगन देऊ लागले. चिंपांझी प्रजातीत मानवाला पण भावना असतात याची जाणीव डॉ. जेन यांच्यामुळे झाली. डॉ. जेन यांच्या निधनाने चिंपांझी प्रजाती एका मातृतुल्य व्यक्तिमत्त्वाला पोरकी झाली आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.