
कीर्ती महाविद्यालयाच्या वेदांत पानसरेने अवघ्या पाच सेकंदांनी सरशी मिळवत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटना आयोजित आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या 17 वर्षे गटाच्या टाइम ट्रायल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या गटात बॉम्बे स्कॉटिशचा विहान देशपांडे दुसऱ्या आणि मुंबई ज्युनिअर कॉलेजचा रायन डिसुझा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत वेदांतने चार किलोमीटरचे अंतर 5ः41 मिनिटांत पार केले, तर विहानने हे अंतर पूर्ण करण्यासाठी 5ः 46 मिनिटे अशी वेळ नोंदवली. रायन डिसुझाने 6ः38 मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. या वयोगटाच्या मास स्टार्ट शर्यतीत हृतिक सोनी, प्रसाद पवनकुमार आणि अर्चित मयेकर अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तिसऱया स्थानी राहिले.



























































