अशी संकटे येती आणि जाती… रोहितच्या वन डे निवृत्तीचा विचार निव्वळ अफवा; रोहितचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांचा दावा

रोहित शर्माला वन डे क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे असते तर तो कसोटी क्रिकेटबरोबर झाला असता; पण त्याला वन डे क्रिकेट अजून खेळायचेय. त्याला आगामी 2027 च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत देशासाठी खेळायचेय. त्यामुळे रोहितच काय, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, ज्या निव्वळ अफवा असल्याचा दावा रोहित शर्माचे शालेय जीवनातील प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केला आहे. गेली अठरा वर्षे त्यांना अशा अफवा आणि संकटे झेलण्याची सवय झाली आणि अशी संकटे येतात आणि त्यांचा खेळ पाहून मार्गही बदलतात, असेही लाड यांनी स्पष्ट सांगितले.

दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माकडून वन डेचे नेतृत्व काढून घेण्यात आले आणि त्याच्या जागी शुभमन गिलकडे ते सोपविण्यात आले. या निर्णयाबाबत बीसीसीआय असो किंवा निवड समिती असो किंवा प्रशिक्षक गौतम गंभीर या तिघांवर समाजमाध्यमांवर शिव्या आणि ओव्या गायल्या जात आहेत. यात दिग्गज कसोटीपटूंनीही रोहितचा निर्णय धक्कादायक आणि घाईत घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आपली नाराजी दर्शवलीय.

रोहितकडून नेतृत्व काढून घेण्यात आल्याचे वृत्त ऐकून दिनेश लाड यांनाही धक्का बसला. पण आज सकाळपासून रोहित आणि विराटची वन डे कारकीर्द अस्ताकडे झुकली असून ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका ही त्यांच्या निरोपाची मालिका असल्याच्या बातम्या ऐकताच दिनेश लाड यांनी याबाबत एकच शब्द काढला, तो म्हणजे निव्वळ अफवा. गेली दोन दशके रोहित आणि विराट देशासाठी खेळलेत आणि त्यांना 2027 पर्यंत वन डे क्रिकेटही खेळायचेय. त्यासाठी त्यांनी आपली फिटनेसची परीक्षाही दिलीय. ते ऑस्ट्रेलियाविरुद्धही पहिल्याप्रमाणेच जोशात खेळतील, असाही विश्वास लाड यांनी बोलून दाखवला.

देशांतर्गत क्रिकेटही खेळणार

रोहित आणि विराट आता कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. जोवर त्यांची इच्छा आहे, त्यांचा फिटनेस आहे आणि त्यांचा फॉर्म आहे, तोवर ते क्रिकेट खेळणार. त्यांना आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही खेळावे लागणार आणि ते त्यात खेळतीलही. संघात स्थान कायम राखण्यासाठी त्यांना जे काही करावे लागणार ते सारेकाही नक्कीच करतील, असेही लाड यांनी छातीठोकपणे सांगितले.

… तेव्हाच वन डे क्रिकेटमधूनही निवृत्त झाले असते

त्यांच्या मनात आता निवृत्तीचा विचार दूरदूरही नाहीय. अशा स्थितीत ज्या काही बातम्या आहेत ती एक रणनीती आहे. काही लोकांनी या दोघांना वन डेतून निवृत्त करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या असल्याचा वास येतोय; पण रोहित आणि विराट अशा बातम्यांना कधीही भीक घालत नाहीत. मुळात ते अशा बातम्या कधी पाहतही नाहीत आणि ऐकतही नाहीत. ते केवळ आपल्या मनाचे ऐकतात. अशा अफवांचा त्यांच्यावर कधीही परिणाम होत नाही. अशा बातम्यांनी त्यांचे मन विचलित झाले असते तर ते इतकी वर्षे देशासाठी खेळलेच नसते. अशी संकटे झेलण्याची दोघांनाही सवय झालीय, असेही लाड यांनी स्पष्ट सांगितले.