
हिंदुस्थानी संघाचा मावळता कर्णधार रोहित शर्मा आणि सुपरस्टार विराट कोहली आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही याबाबत क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. विराट-रोहितला डच्चू देऊन युवा चेहऱयांना संधी दिली जाऊ शकते असा कयास लावला जात असताना, हिंदुस्थानचा माजी खेळाडू इरफान पठाणने रो-कोच्या चाहत्यांना दिलासा मिळेल असे भाष्य केले आहे. विराट आणि रोहितने सराव कायम ठेवला तर ही जोडी विश्वचषकापर्यंत टिकेल, असे इरफानने म्हटले आहे.
रो-कोने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसतील. जर त्यांना त्यांच्या शेवटच्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्थात विश्वचषकात खेळायचे असेल तर त्यांना त्यांचा फॉर्म कायम ठेवण्यासाठी सातत्याने सराव करावा लागेल, असे इरफान पठाणने स्पष्ट केले.