
नालायकांच्या हाती सत्ता दिली तर नवी मुंबईचे वाटोळे होईल अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना डिवचल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियात नाईकांचे गाजलेले व्हिडीओ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा इशारा दिला होता. त्यावर नाईक आज जोरदार भडकले. वाट कसली पाहता… माझे व्हिडीओ खुशाल व्हायरल करा. मी तयार आहे, असे आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिले. दरम्यान, पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिंदे गटात चांगलाच वाद उफाळून आल्याने महायुतीमधील वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये आज आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाईक यांनी ठाणे महापालिकेतील लाचखोरी, तसेच जनता दरबारावरून राजकारण करणाऱ्या शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. नाईक यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘नालायक’ केला होता. त्याला शिंदे गटाच्या म्हस्के यांनी इशारा दिला होता. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गणेश नाईक यांनी म्हस्के यांना प्रतिआव्हान दिले आहे.
वाट कशाला बघता, मी तयार आहे !
माझे हात आणि मन साफ आहे, परंतु जे नालायक आहेत ज्यांनी शक्तीचा दुरुपयोग केला आहे. ३५ वर्षांच्या या काळात किती आले आणि किती गेले, काही लोकांची तर नावेही आठवत नाहीत. माझ्या गरजेएवढे पैसे माझ्याकडे आहेत. ईडी, सीबीआयची रेड पडेल असं मी कामच करत नाही, मला नीट झोप येते. तेव्हा माझे व्हिडीओ कोणी व्हायरल करणार असेल तर खुशाल आताच करावे, वाट कशाला बघता, मी तयार आहे, असेही नाईक यांनी शिंदे गटाला सुनावले.