
माजी आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून एका वृद्धाला डोंबिवलीतील भाजी मंडईत लुबाडण्यात आले. राजेंद्र नायर (63) असे फसगत झालेल्या वृद्धाचे नाव असून ते ठाकुर्लीच्या संतवाडीतील संतोषी माता सदनात राहतात. भरबाजारात ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चेन आणि अंगठी लांबवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. राम नगर पोलीस लुटारूचा शोध घेत आहेत.
मंगळवारी 4 वाजता डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या भाजी मार्केटमध्ये ही घटना घडली. दोन मिनिटांत हातचलाखी ठाकुर्ली, चोळेगाव, संतवाडी भागात राहणारे राजेंद्र नायर मंगळवारी संध्याकाळी चार वाजता डोंबिवली पूर्व भाजी बाजारात खरेदीसाठी आले होते. तेवढ्यात 50 वर्षीय अनोळखी इसम त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. मी राजू पाटील यांचा नातेवाईक आहे असे सांगत त्या इसमाने राजेंद्र नायर यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. बोलत असताना राजेंद्र नायर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातामधील अंगठी असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज काढून लुटारूने पलायन केले.
तुम्ही वृद्ध आहात, हल्ली भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे असा ऐवज घालून फिरू नका, असे बोलत राजेंद्र यांच्याजवळील चेन आणि अंगठी चोरट्याने एका कागदात गुंडाळली. हातचलाखी करत दागिन्यांची पुडी नायर यांच्या खिशात ठेवत असल्याचे नाटक करत चोरट्याने दोन मिनिटांत लांबवली. काही वेळाने नायर यांनी खिशातील पुडी पाहिली असता त्यात सोन्याचा ऐवज नव्हता. त्यामुळे नायर यांनी राम नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.