धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात मुलाने घेतला आईचा जीव

लखनऊच्या रायबरेली रोड कल्ली बाबू खेडा गावामध्ये डेअरी संचालक रमेश यांच्या पत्नीचा खून त्यांच्यात मुलाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याने आपल्या आईचाच जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.

मुलाला ऑनलाईन गेम खेळण्याची लत लागल्याने तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज चुकविण्यासाठी घरातले दागिने चोरत असताना आईने पाहिले आणि त्याला रोखले. आईचा अडथळा पाहून तरुणाने आईलाच संपवून टाकले आणि दागिने घेऊन पसार झाला.

पोलीस उपायुक्त दक्षिणी निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. त्याने घरातले दागिने चोरल्यानंतर वडिलांची बाईक घेऊन तो पसार झाला. तो कॅटोमेण्टच्या रस्त्याने चारबागला पोहोचला. तिथे बाईक उभी करुन त्रिवेणी एक्सप्रेसने पळाला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला फतेहपुर जिल्ह्यातील बहेरा अल्लीपुर औरम्हा गावात अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याचे कबुल केले.

निखील बीएचे शिक्षण घेत होता. तपासात त्याने सांगितले की, त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. जवळपास वर्षभर तो ऑनलाईन गेम खेळत होता. गेम आणि सट्ट्यामध्ये तो जवळपास 50 लाखाचे ट्रान्झेक्शन केले होते. निखिलच्या म्हणण्यानुसार, तो tirangagamee.games च्या लिंकवरून एव्हिएटर गेमवर सट्टा लावत असे.