
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांना मिळणारे दुय्यम स्थान हा जणू रोगच झाला आहे. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’च्या बाबतीतही हेच घडलं आहे. मराठी माती आणि नाती यांचा सुगंध घेऊन आलेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरला. कोणत्याही धनाड्य व्यक्ती किंवा कॉर्पोरेटचे पाठबळ नसलेल्या या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही सुद्धा प्रेक्षक थिएटरमध्ये खेचून आणलं. मात्र ‘कांतारा’ (kantara chapter 1) प्रदर्शित होताच या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हाऊसफुल्ल चलता असतानाही जवळजवळ सर्वच थिएटरमधून काढून टाकण्यात आला. सध्या फक्त गोरेगावच्या मूव्हीटाईम हब येथे एकमेव शो हाऊसफुल्ल चालतोय. यामुळे मराठी चित्रपटांना बॉलीवूड आणि साऊथ दाक्षिणात्य चित्रपटांसमोर मिळणारी ही दुजाभावाची वागणूक पुन्हा एकदा समोर आली आहे.
दरम्यान, ‘कांतारा’मुळे थिएटर मिळत नसल्याने ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटासाठी आता वेंगुर्लेकर पुढे सरसावले आहेत. थिएटर नाही म्हणून वेंगुर्लेकरांनी वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे या चित्रपटाचे दोन शोचे आयोजन केले आणि बघता बघता दोन्ही शो हाऊसफुल्ल झाले. यातच अजून शोजची मागणी आली. निर्मात्यांना प्रेक्षकांच्या मागणीनुसार एका दिवसात चार शो लावावे लागले आणि काही मिनिटातच हे चारही शो हाऊसफुल्ल झाले. रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला.
मुलांची न होणारी लग्न आणि शहरांना घेऊन असलेले आकर्षण हा विषय घेऊन हसत खेळत निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा शेवटी अंतर्मुख करतो. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा ते चांगले नसतात अशी बोंबाबोंब करणाऱ्या तोंडांना लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी “अ’ दर्जाचे उत्तर दिले आहे. पण राजाश्रय नसल्याकारणाने लोकचळवळीतून तयार झालेला हा सिनेमा सर्व दूर पोहोचत नाही आहे, जी आत्ताची गरज आहे.