
वेस्ट इंडिज संघांची एकेकाळी क्रिकेट विश्वावर दहशत होती. दर्जेदार खेळाडूंमुळे वेस्ट इंडिजला हरवण अनेक संघांसाठी एका स्वप्नासमान होतं. परंतू याच वेस्ट इंडिजची हालत आता अगदी नाजूक झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये वेस्ट इंडिजचा खेळ अगदीच सुमार राहिला आहे. अशातच पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव राखून 140 धावांनी तिसऱ्याच दिवशी फडशा पाडला. वेस्ट इंडिजच्या याच खराब कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी याने मोठं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिजच्या खराब कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना डॅरेन सॅमी म्हणाला की, “वेस्ट इंडिजची कसोटी क्रिकेटमधील घसरण सिस्टममध्ये असलेल्या कॅन्सरसारखी आहे, ज्याची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे. आम्ही येथे (हिंदुस्थानात) शेवटची कसोटी मालिकी 1983 साली जिंकलो होतो, जेव्हा माझा जन्म झाला होता. मला माहित आहे की माझ्यावर सर्वांच्या नजरा असतील. आम्ही टीकेला घाबरत नाही. या समस्येचे मुळ दोन वर्षांचे नाही. ही समस्या अशा कॅन्सरसारखी आहे, जी आधीच या सिस्टममध्ये होती. आणि हे आमच्या सिस्टममध्ये खोलवर रुजलेले आहे. आम्ही बऱ्याच काळापासून आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहोत आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.” अस डॅरेन सॅमी म्हणाला आहे.
वेस्ट इंडिज एकेकाळी जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक होता, परंतु त्यांनी टीम इंडियासारख्या अव्वल संघाप्रमाणे त्याचा फायदा घेता आला नाही, अशी खंतही डॅरेन सॅमीने यावेळी बोलून दाखवली. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 10 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात जिंकल्यामुळे टिम इंडियाने या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.