
>>गुणवंत सराफ<<
तालुक्यातील सिपेगाव, तांबूळवाडी तसेच मुदखेड या तीन गावांना जाण्यासाठी असलेला अवघ्या साडेसात किमीचा रस्ता मंजूर आहे, त्यासाठीचा साडेपाच कोटींचा निधी पडून आहे. वर्षभरात हा रस्ता पूर्ण करण्याची अट असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून साधे १०० मीटरही काम झालेले नाही. कंत्राटदार, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे सिपेगावचा संपर्क दोन महिन्यांपासून तुटलेलाच आहे.
पालम तालुक्यातील सिपेगाव, तांबूळगाव तसेच मुदखेड या तीनही गावांना जाणारा रस्ता अवघ्या साडेसात किमीचा आहे. मात्र कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दर पावसाळ्यात या तीनही गावांचा जगापासून संपर्क तुटणे ठरलेले. विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, व्यापारी यांना रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. २० सप्टेंबर २०१९ रोजी तीनही गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शिवसेना उपनेते तथा खासदार संजय जाधव यांनी पुढाकार घेऊन रस्ता मंजूर करून घेतला. २६ जानेवारी २०२५ रोजी रस्त्याच्या कामाचे थाटात भूमिपूजनही झाले. १ जानेवारी २०१६ पर्यंत हा रस्ता तयार होणे बंधनकारक असतानाही अद्याप १०० मीटर काम झालेले नाही. लातूर येथील आशीर्वाद कंपनीला हे काम मिळाले असून त्यांनी नेमके काय काम केले, हा वादाचा विषय आहे. मुदखेड ते सिपेगावदरम्यान सिपेगावला तालुक्याशी जोडणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सिपेगावातील विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी, रुग्णांना सर्कस करून हा रस्ता पार करावा लागतो.
पेठपिंपळगाव ते तांबुळगाव दरम्यान पुलांचे काम अर्धवट करून सोडून दिले आहे. या भागातील शेतकर्यांचा दूध संकलनाचा, भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. रस्ताच नसल्यामुळे शेतकर्यांना ४०-४० लिटरचे दुधाचे कॅन डोक्यावर किंवा बैलगाडीतून न्यावे लागत आहेत. काम करणारा कंत्राटदार गायब आहे. संबंधित विभागाचे अधिकारी नेमके काय करतात, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. – डॉ. भीमराव भाऊराव सुरनर, पशुवैद्यक