
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर ते कांदिवली स्थानकादरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर आणि राम मंदिर आणि कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीच्या कामांसाठी चार तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे.
ब्लॉक कालावधीत सर्व अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या/सहाव्या मार्गावर धावतील. तसेच पाचव्या मार्गावरील सर्व गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील. काही अंधेरी आणि बोरिवली गाड्या गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर पाच तास मेगाब्लॉक
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 वाजल्यापासून ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.17 वाजल्यापासून ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही.