साधना आणि  परंपरेचा दैवी स्पर्श

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांचे  जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे केले जात आहे. यानिमित्त त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास मांडणाऱ्या `माणिकमोती’ या पुस्तकाच्या निर्मितीपासून वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

दि. 10 ऑक्टोबरपासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे माणिक वर्मा फाउंडेशन आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमाने `माणिक स्वर महोत्सव’    या भव्य त्रिदिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त माणिक वर्मा यांची कन्या, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी माणिकताईंच्या स्मृतींना दिलेला उजाळा.

आईचा जन्म 1926 सालचा. आईची आई म्हणजे आमची माई…  हिराबाई दादरकर. अत्यंत सुंदर, सुरेल गायिका!

पण त्या वेळी स्त्री गायिका दुर्मिळ होत्या. ती तबला पण छान वाजवायची. माणिक जन्माला आल्यावर तिने  बाळगुटीबरोबर संगीताचीही गुटी पाजायला दिली असणार. तिला शास्त्राrय संगीत शिकवण्यासाठी घरासमोरच्या भारत गायन समाजात भोपे गुरुजींची शिकवणी सुरू झाली आणि वयाच्या 13 व्या वर्षी माणिकने प्न्न् कंपनीसाठी `सनातन नाद हा’ हे गाणं गायलं आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. सेवासदनमध्ये शिक्षण आणि त्याचबरोबर सुरेशबाबू माने,  इनायत खान अशा वेगवेगल्या गुरूंकडून संगीत शिक्षण सुरू केलं. माईचा कायम आग्रह राहिला की, तिने B.A. ची पदवी घेतलीच पाहिजे. पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये शिकत असताना ती एक लोकप्रिय गायिका म्हणून प्रसिद्ध  झाली.स्वतंत्र घरगुती आणि छोटे प्रोग्रामही करू लागली.

नंतर सुधीर फडके यांनी तिच्याकडून `गोकुळ’ या हिंदी चित्रपटासाठी एक गाणं गाऊन घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तिने शास्त्राrय संगीताचा उत्तम अभ्यास केलाय. तेव्हापासून `माणिक दादरकर’ हे नाव पार्श्वगायिकांच्या यादीत झळकू लागलं. मग फडके,  गदिमा आणि माणिक या त्रिकुटाने हट्टाने प्न्न् साठी `सावळाच रंग तुझा’ रेकॉर्ड केल आणि हे गाणं राष्ट्रगीतासारख घरोघरी वाजू लागलं. या रेकॉर्डच्या खपाने रेकॉर्डब्रेक केला. `माणिक दादरकर’ हे नाव साऱ्या महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाल. असं होऊनही माणिकने शास्त्राrय संगीताची तालीम आणि मेहनत कधीच सोडली नाही.

अमर वर्मा यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतरही  अलाहाबादचे पंडित भोलानाथ भट्ट,  मुंबईचे पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित अशा गुरूंकडूनही सगळ्या गान प्रकारांवर मेहनत घेऊन  रागदारी, भावगीत,  अभंगाबरोबर मैफलींमध्ये दादरा,  ठुमरी,  नाटय़ संगीतही तितक्याच तयारीने गायला सुरुवात केली. भारतभर संगीत महोत्सवांमध्ये त्यांना गाण्याची आवर्जून आमंत्रणं येत असत. गदिमा यांच्या `गीतरामायण’मध्ये तर बाबुजींनी सीतेची सर्व गाणी माणिककडूनच गाऊन घेतली. गाण्याचा अर्थ समजून घेऊन त्या भावनांसकट शब्दांतून सुरात प्रकट करण्याचं तिचं कसब रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे.

 मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी तिच्या माहेरचे,  सासरचे सगळे कुटुंबीय राहायला असायचे. तीन खोल्यांचं घर दादरच्या मकरंद सोसायटीमधलं. सबंध घरभर गाद्या घालून 18/20 जण रात्री झोपलेलो असायचो. अशा वेळी पहाटेचा तिचा रियाज रात्रभर वाळलेल्या बाथरूममध्ये चटई घालून ओमकाराने व्हायचा तो दोन तास चालायचा. हा ओमकार ऐकत आम्ही मोठे झालो. आई कलाकार म्हणून किती मोठी झाली तरी तिचं मोठेपण कधीच घरी आणलं नाही. हीच शिकवण तिने तिच्या वागण्यातून आम्हाला दिली.

`माणिक दादरकर’ची `माणिक वर्मा’ झाली तेव्हा तर तिची गायकी अजूनच उजळली आणि या सगळ्यामागे होती  अमर वर्मा यांची साथसंगत आणि सोबत. तिला मोठं करण्यासाठी आपण आपल्या इच्छा, ईर्षा  बाजूला ठेवून आमचंही संगोपन केलं.  हे करताना तिला कधीच त्याची बोचणीही लागू दिली  नाही.  आम्हाला आमच्या पंखांनी उडू दिलं आणि आईला तिच्या कलेत सर्वार्थांनी फुलू दिलं. आपला पुरुषार्थ बाजूला ठेवून घरातल्या पाच स्त्रियांना स्वतंत्रपणे जगू दिलं. अशा थोर आईवडिलांना शतश: वंदन !