होता जीवा, म्हणून वाचला शिवा

भोर तालुक्यातील आंबवडे गाव हे मराठेशाहीतील शूरवीरांचे गाव. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. जिवा महाला यांचे समाधीस्थळ पुणे जिह्यातील भोर तालुक्यातील आंबवडे गावात आहे, जेथे कान्होजी जेधे आणि भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांचीही समाधी आहे.

जिवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान साथीदार होते आणि त्यांची समाधी आंबवडे येथे आहे. भोरपासून 12 किलोमीटरवर असलेल्या गावातील प्राचीन नागेश्वर मंदिर परिसरात जीवा महाला यांची ही समाधी फार जुनी दिसत नाही. अर्थात तिचे जुने बांधकाम पाडून नव्याने करण्यात आले असावे अशी समाधीची रचना आहे. जीवा महाला संकपाळ हे वाईजवळील कोंडवली गावातील. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची अफझलखानाशी चकमक झाली. त्यावेळी जीवा महाला त्यांचे अंगरक्षक हेते. महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर अफझलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याने महाराजांवर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला परतवून लावत जीवाने निकराने वार केले आणि महाराजांचे प्राण वाचले. यात सय्यद बंडाचा हात तुटला. जीवा महालाने दाखवलेल्या या शौर्यामुळे `होता जीवा, म्हणून वाचला शिवा’ ही म्हण रूढ झाली.