नवलच!  भूमी-सुवर्ण!

>> अरुण

दसऱ्यापासूनचे दिवाळीचे दिवस. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले तरीसुद्धा सुवर्ण खरेदीसाठी गर्दी होतच आहे. आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांची हौस आणि महत्त्व जितकं, तितकं जगात अन्यत्र नसेल. सोन्याचा वापर दागदागिने, भांडीकुंडी आणि अनेक देवळांवरील कळस इत्यादी ठिकाणी हजारो वर्षे झाला आहे. न गंजणारा, सतत चमकदार राहणारा हा धातू हिंदुस्थानवासीयांसाठी जिव्हाळय़ाचा विषय आहे. हौसमौजेसाठी दागिने, राजेरजवाडय़ांकडे मोठी भांडी, सिंहासन, मुकुट, महालांमध्ये सुवर्णाची नक्षी याशिवाय आयुर्वेदात सुवर्णभस्म आणि सोन्याचा काढा वगैरे गोष्टींसाठीसुद्धा या झळाळणाऱया धातूचा उपयोग होत आला आहे.

सोन्याच्या या आपल्या ओढीबद्दल जगात कुतूहल असतं. युरोप-अमेरिकेत मोजकेच दागिने बहुधा हिऱयाचे असतात. त्यांना आपल्या देशातल्या `यलो मेटल’च्या हव्यासाचं आश्चर्य वाटतं. परंतु जागतिक, आर्थिक विनिमयात सोन्याला प्रचंड किंमत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुशल कारागिरांनी घडवलेले सोन्याचे दागिने छान दिसतातच, पण व्यक्तिमत्त्वाचं सौंदर्यही खुलवतात. दागिन्यांचा वापर आजच्या काळात महिलाच अधिक करतात. क्वचितच पुरुषही मोजके दागिने वापरतात, ते म्हणजे गळय़ातली सोनसाखळी किंवा अंगठी वगैरे. पूर्वी मात्र अगदी अठराव्या शतकापर्यंत पुरुषही सोन्यामोत्याचे दागिने वापरत.

सोनं नैसर्गिकरीत्या तयार होतं. कृत्रिम मोती किंवा हिऱयांसारखं ते कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. सोन्याच्या खाणी असतात. हिंदुस्थानात कर्नाटकमधील `कोलार’ येथील सुवर्णखाण प्रसिद्ध होती. आता ठिक  ठिकाणीही देशात सोनं मिळतं.

पृथ्वीवरच्या सर्व खाणींमधील किंवा भूपृष्ठाखालील सोन्याचा उपसता येईल असा साठा सुमारे तीन लाख मेट्रिक टन इतका आहे. यात सर्व खाणींमधून मिळून शकणाऱया सोन्याचाही अंदाज आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 2,44,000 मेट्रिक टन सोने खाणीतून काढण्यात आले असून आजमितीला सोन्याचे आणि ज्ञात साठे सुमारे 57,000 मेट्रिक टन एवढे आहेत! आजवर सापडलेल्या सोन्याचा साठा एकत्रित केला तर तो प्रत्येक बाजू 75 फूट असणाऱ्या घन (क्यूब) ठोकळय़ात सामावेल असा एक अंदाज आहे. आणखी सुमारे 1,65,000 टन सोनं भूगर्भात असून ते खणून काढणं दुरापास्त आहे असंही म्हटलं जातं.

हिंदुस्थान एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून जगात ओळखला जायचा. ते सारं सोनं म्हणजे भूमी-सुवर्णच. पृथ्वीवर त्याचा संचय किती ते जाणून घेणं मनोरंजक.