
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. भर उन्हात हा मोर्चा निघाला. या रणरणत्या उन्हातून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. या मोर्चात मराठवाड्यातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्यनेने सहभागी झाले. क्रांतीचौकातून हा मोर्चा निघाला आणि गुलमंडी येथे मोर्चा धडकला. यावेळी समोरोपाच्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी गावच्या एका शेतकऱ्याने हालकाची परिस्थिती कथन केली. मे महिन्यापासून ते आतापर्यंत पाच महिने सतत अतिवृष्टी होत आहे. यात शेतकऱ्याचं पिक वाहून गेलं, घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेली. पैठण, सिल्लोड, वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकं नष्ट झाली, असे शेतकऱ्याने सांगितले. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे असतील जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांवर काही अन्याय झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, काही संकट आलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठिमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. म्हणून महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातले सर्व शेतकरी आज तुमच्याकडे आशेने पाहत आहे, अशी भावना शेतकऱ्याने व्यक्त केली. शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला, शेतकऱ्याची सोयाबीन चारशे रुपये क्विंटल चालली, शेतकऱ्याच्या मक्याला १५०० रुपये भाव मिळाला. काहीच परवडत नाही. शेतकऱ्याला कधीच बेरीज करता आली नाही, या सरकारमुळे सगळी वजाबाकीच चालू आहे, अशी व्यथा शेतकऱ्याने मांडली.
उद्धव ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू – अंबादास दानवे
अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानाची पाहण्यासाठी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका सभेत औसा तालुक्यातील उजनी येथील भूषण कोळी या शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी “राजकारण करू नको”, असे म्हटले. पोलिसांनी कोळी यांना ताब्यात घेतलं होतं. त्या भूषण कोळी यांनीही आपली व्यथा मोर्चात मांडली.
हे नालायक आणि खोटं बोलणारं सरकार आहे. आतापर्यंत दिलेलं एकही आश्वास त्यांनी पूर्ण केलेलं नाही. ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. ओला दुष्काळ म्हणजे बोली भाषा आहे, असं सरकार म्हणतंय. आणि पाहणी करायला आले तर रस्त्यावरून खाली उतरत नाही. त्यांना काय माहिती शेतात काय चाललंय. काय नुकसान झालंय कसं कळणार? शेतकऱ्याचं पिकच काय तर शेतही वाहून गेलं. आता काय बघायला येणार? पंचनामा करायलाही कोणी येत नाही. तलाठ्याला सांगितला पंचनामा करा. तलाठी म्हणतो, आमच्याकडे जीर आलेला नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. आमच्याकडे काहीही आलेलं नाही, असं तलाठी सांगतो. म्हणजे इतकं खोटं आणि नालायक सरकार आहे. हा फक्त मराठवाड्यातला मोर्चा आहे. आता मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाऊ. आणि सगळे शेतकरी मिळून मंत्रालय बंद पाडू. हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेच लागतील. सातबारा यांना कोरा करावाच लागेल, असा इशारा शेतकरी भूषण कोळी यांनी दिला. त्यांना फक्त प्रश्न केला की, हेक्टरी मदत की देणार? सगळ्यांसमोर जाहीर करा मदत? तर मला म्हणले, राजकारण करू नको. शेतकरी कशाला राजकारण करेल. राजकारण तर ते करतात, त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे, असे शेतकरी भूषण कोळी म्हणाले.