अभिप्राय – रम्य आठवणींचा ‘कॅलिडोस्कोप’

>> राहुल गोखले

जुन्या आठवणींमध्ये रमायला बहुतेक जणांना आवडते. स्मरणरंजनात निराळी खुमारी असते. त्या आठवणी केवळ गतकाळात घेऊन जातात असे नाही, तर त्या वेळचे संदर्भ वर्तमानाशी सांधतात. सुहास बारटक्के यांचे ‘कुंतलगंध’ हे पुस्तक (प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन) हे अशाच रम्य आठवणींचे आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, ‘कॅलिडोस्कोप फिरविला की, आतल्या बांगडय़ांच्या काचांचे तुकडे जसे नवनवीन आकार धारण करतात तशाच या आठवणी प्रकाशमान होऊ लागतात.’
लेखकाचे वास्तव्य कोकणातील आणि त्यामुळे साहजिकच यातील अनेक आठवणी त्याच मातीतील आहेत. कोकण म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतो तो निसर्ग. लेखकाने त्यासंदर्भातील अनेक आठवणी जागवल्या आहेत. कधी आपले वृक्षप्रेम कथन करताना बकुळीच्या झाडांचे मनोहारी दर्शन घडविले आहे. तेही इतके तपशीलवार की, वाचकाला बकुळीचा सुगंध आल्याचा भास व्हावा. मात्र या व अन्य लेखांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या आठवणींमध्ये रमतानाच लेखकाला त्या आठवणींशी विसंगत वर्तमानाची जाणीव आहे. त्यामुळे एकीकडे बकुळीचे झाड कुठेही दिसले की, त्या झाडाखाली कुठे रोपे उगवली आहेत का? ते आधी पाहतो आणि ते घरी आणून रुजवतो, असे लिहितानाच लेखक सर्वत्र सुरू असणाऱया वृक्षतोडीवर चिंताही व्यक्त करतो. कोकणातल्या पावसाचे वर्णन करताना रातकिडे, काजवे यांची आठवण लेखक जागवतो. त्याच वेळी काही वर्षांपूर्वी बेडकांची संख्या घटल्याने कोकणात कीटकांचे प्रमाण वाढले आणि भाताचे उत्पादन मात्र घटले याची आठवण ताजी करतो. कधी स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना ज्या रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्या तुरुंगाची कहाणी लेखकाला आठवते; पण त्याबरोबरच तुरुंग हा कैद्यांतून माणूस घडविणारी शाळा असू शकेल का? अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतो. त्याच प्रकारचा ‘मुक्काम पोस्ट येरवडा सेंट्रल जेल’ हा लेख अतिशय वाचनीय. कैद्यांचे तुरुंगातील आयुष्य कसे असते, यावर हा लेख प्रकाश टाकतोच; पण माधव कर्वे यांच्यासारखा कारागृह उपमहानिरीक्षक कैद्यांना सन्मार्गावर नेऊ शकतो याचेही दर्शन घडवितो. कैद्यांसाठी नवनवीन योजना राबविणारा कर्वे यांच्यासारखा अधिकारी विरळाच आणि म्हणूनच त्यांच्याविषयी लेखकाने आत्मीयतेने जे लिहिले आहे ते वाचकाला या विषयाकडे नव्या दृष्टीने पाहण्यास उद्युक्त करते.

गो. नी. दांडेकर हे लेखकाचे श्रद्धास्थान. त्यांच्याशी निगडित अनेक आठवणी पुस्तकात आहेत. गोनीदांचे गुडघे येथील घर शोधून काढण्यासाठी केलेला आटापिटा लेखकाने शब्दांत मांडला आहे. मात्र त्यानिमित्ताने समाज म्हणून आपण अशा श्रेष्ठ साहित्यिकांची किती ‘बूज’ राखतो याबद्दल लेखक अंतर्मुखही करतो. गोनीदांशी लेखकाचा असणारा पत्रव्यवहार वाचकाला गोनीदांच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडवितो. काही पत्रांची छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट आहेत. गोनीदांच्या पत्रांतील खास वैशिष्टय़े लेखकाने नोंदविली आहेत. त्यांनी पत्रांतून सहज म्हणून लिहिलेली वाक्ये वाचणाऱयाच्या चिरकाल कशी लक्षात राहतात, याचे दाखले लेखक देतो. ‘हरिखलो’, ‘दूर फिरायला जातो’, ‘वैद्यांनी ठाणबंद केले आहे’ अशा खास गोनीदांच्या म्हणून असणाऱया शब्दप्रयोगांचा उल्लेख लेखक करतो.

कधी केरळच्या पावसाची आठवण लेखकाला येते; तर कधी नेदरलँडच्या प्रवासातील आमस्टरडॅममधील नागरिकांच्या सायकल प्रेमाचे स्मरण लेखकाला होते. त्यानिमित्ताने भारतातदेखील सायकल पुन्हा हवीहवीशी वाटावी अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतो. कधी पिंपळ वृक्षांचा घडलेला सहवास लेखकाला कातर करतो, तर कधी समुद्रकाठचा भुळुभुळु पडणारा पाऊस आठवतो. प्रसन्न लेखनशैली आणि नेमक्या शब्दांचा केलेला प्रयोग यांमुळे हे लेख उत्तम उतरले आहेत. यातील अनेक आठवणी वाचकांना आपल्या आठवणींच्या जगाशी जोडतील; तर काही वर्णने वाचकाला त्याच घटना-प्रसंगाकडे निराळ्या दृष्टीने पाहण्यास उद्युक्त करतील. अशा आठवणी व अनुभव हे वैयक्तिक असले तरी एका अर्थाने ते सार्वजनिक शहाणपण देणारे असतात. प्रस्तुत पुस्तक त्याचे उदाहरण ठरते. सतीश भावसार यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.

कुंतलगंध
n लेखक ः सुहास बारटक्के
n प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
n पृष्ठे ः 120 n मूल्यः रुपये 200