
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे आणि एसटी स्थानकांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रेल्वे डबे, स्थानके आणि एसटी बसस्थानके टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेगाड्यांच्या डब्यांमधून तसेच बसस्थानकांवरून नागरिकांचा मौल्यवान ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.
पुणे रेल्वे विभागातून दररोज सुमारे दीडशेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावतात. या गाड्यांमध्ये रोज जवळपास पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. अलिकडच्या काही दिवसांत स्लीपर आणि एसी आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचे मोबाइल फोन, लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये चोरटे थेट आरक्षित डब्यांमध्ये शिरून प्रवाशांच्या वस्तू लंपास करत आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस या दोन्ही यंत्रणा सुरक्षा पुरवित असतानाही हे प्रकार घडत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, काही तक्रारींमध्ये पोलिसांकडून चोरीऐवजी वस्तू ‘हरवल्याची नोंद’ केली जात असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या स्थानकांवर दिवाळीच्या काळात प्रवासी संख्या दुप्पट होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करतात.
दरवर्षी सणासुदीच्या काळात अशा घटनांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे रेल्वे सुरक्षादल, रेल्वे पोलीस, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांसमोर या गुन्ह्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे आहे. सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांनी स्वतःच्या वस्तूंबाबत अधिक सतर्क राहाणे, अज्ञात व्यक्तींवर विश्वास न ठेवणे, वस्तू डब्यात निष्काळजीपणे न ठेवणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.
स्थानकांवर गस्त वाढविण्याची मागणी
दिवाळीच्या उत्साहात प्रवाशांचा आनंद चोरट्यांच्या भीतीने नकोसा होऊ नये, यासाठी यंत्रणांनी अधिक सज्ज होणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात चोरट्यांचे प्रमाण वाढते. विशेषतः गजबजलेली स्थानके टार्गेट केली जाते. त्यामुळे स्थानकांवर पोलिसांकडून अतिरिक्त गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.