
नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील औटी डेरेमळा शिवारात सुभाष चंद्रसेन औटी यांच्या घराजवळ सातत्याने येत असलेली बिबट्याची मादी पिंजऱ्यामध्ये आज सकाळी जेरबंद झाली. येथील शेतकरी उमेश डेरे यांच्या सीताफळ बागेत वन विभागाने लावलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सुमारे दीड ते दोन वर्षे वयाची बिबट्याची मादी जेरबंद झाली. तिला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.
बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर होणारा हल्ला पाहाता ग्रामपंचायत सदस्य भागेश्वर डेरे, स्थानिक शेतकरी उमेश डेरे, सुभाष आवटी, महेश डेरे, शैलेश डेरे यांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी येथील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे, किरण वाजगे यांच्या मदतीने पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथे पाठवण्यात आले.
अनेक ठिकाणी बिबट्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांमध्ये बिबटे ट्रॅप होत असून, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त बिबट्यांची संख्या वाढली आहे. येथे सुमारे ५६ पेक्षा जास्त बिबट्यांची संख्या झाली असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, माणिकडोह येथील सध्या सुमारे ४० ते ४५ बिबटे ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे.
दरम्यान, बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता, सुमारे १२ ते १३ एकर जागा जलसिंचन विभागाने यापूर्वीच वन विभागाला हस्तांतरित केली आहे. तेथे आणखी काही बंदिस्त ठिकाण व बिबट्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिकरीत्या जागा करण्यात येत आहे. यासाठी अजून काही अवधी लागणार असल्याने वन विभागापुढे आता पकडलेले बिबटे कोठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी पकडलेले बिबटे जर सोडले तर याद राखा, असा सज्जड इशारा वन विभागाला दिल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडलेले बिबटे व त्यांची देखभाल करण्यासाठी लागणारी आरोग्य सुविधा पुरेशी आहे का? हे विचारण्यासाठी बिबट निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.